पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

सद्गुरुबोध – दिवाळी अंक २०२२ सद्गुरुवचन

‘ज्ञान’ ही अनेक मजल्यांची इमारत आहे अशी कल्पना केली तर निरनिराळ्या देशातील लोक या ज्ञान-प्रासादाच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहत आहेत ही वस्तुस्थिती स्पष्टपणे समजेल. किंबहुना एकाच मजल्यावर डॉ. राधाकृष्णन सारख्या तत्त्ववेत्त्यांच्या घरात अज्ञ गडीमाणसापासून तो भेटीस आलेल्या अत्यंत विद्वान, उच्च नेते व मोठमोठया इंजीनियर्स सारखेही त्या घरात वावरताना दिसतील व मोठमोठ्या शास्त्री पंडितांचीही एखादेवेळी गर्दी होईल. त्यावरुन ज्ञानसापेक्षतेची कल्पना येईल. शास्त्रज्ञांनी बिनचूक वाटणार्‍या  पद्धतीने केलेली भौतिक सिद्धान्ताची तत्त्वे व सत्ये प्रयोगांनी त्या त्या काळी प्रस्थापित केलेली असली तरी त्यात बिनचूकपणा वा त्रिकालाबाधित सत्य नसते, हे आज जगात स्पष्टपणे उघड झाले आहे. कारण भौतिक शोधांनी माणसास सुखाची साधने प्राप्त झाली, हे कबुल करूनही असे म्हणावे लागते की तो पूर्वकाळापेक्षाही भयभीत व दु:खी आहे. कारण भौतिक प्रयोगाच्या प्रचंड घडामोडींमुळे मानव भौतिक सुखाच्या शिखरावर पोहोचला. पण ते सर्व इंद्रियगम्य म्हणजेच इंद्रियांना खाद्य म्हणूनच. इंद्रिये जशी मर्यादित शक्तींची तशीच ती सुखेही स्थूल इंद्रियांप्रमाणेच मर्यादितच.   

      हे ओळखून तो अतिंद्रिय सुखाच्या शोधात लागून तो जसा जसा व्याकुळ होत गेला तसा तसा त्याच्यातील सुप्त शक्तींना चालना मिळून तो इंद्रियांवर ताबा ठेवू लागला व त्याने स्वतःमधीलच प्रचंड शक्ती कोठाराची किल्ली हस्तगत करून सुप्त सात्त्विक चैतन्यगाभ्यास आवाहन करू लागला. आणि सर्व सुखाचे, आनंदाचे आगर फक्त दयाघन परमेश्वरच असून तो आपल्याच अंतरात व्यापकरुपाने असल्याचे त्याला समजले. स्थूलमर्यादित इंद्रिय शक्तींना मागे सारून किंवा त्यावर नियंत्रण ठेवून, पाश्चात्यांचे प्रयोगाने दिपलेल्या व अंती भयभीत झालेल्या मानवास स्थूलप्रयोगावरून सूक्ष्म अंतस्थ प्रयोगशाळेत नेणारे म्हणजेच संत, महात्मे, सद्गुरु ! हा प्रचंड भरभराटीचा काळ म्हणजे आपली मूळ भारतीय संस्कृती ! त्यातील इह व पर कल्याण होणारी ऋषी-मुनींची अनेक संत महात्म्यांची प्रेरक शक्ती व ती प्राप्त करण्याचे संजीवक शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र व त्याची प्रयोगशाळा म्हणजे स्वतःचे अंतरंग व त्यातील उपकरणे म्हणजे मन, बुध्दी, चित्त वगैरे साधने व पथ्य व भांडवल म्हणजेच नियमन व उपासना! उत्कट स्पंदने निर्माण करणारी वृत्ती. आपल्या मनात आपणच अत्यंत व्याकुळतेने, शरणबुध्दीने, तळमळीने व भक्तिभावाने निर्माण करून आपल्यातील असलेल्या निर्भेळ आनंदभावात जाणे म्हणजे उपासना. त्यालाच ‘ज्ञान’ म्हणतात. प. पू. श्री. विष्णुदास महाराज