पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

श्रीगुरुमंदिर ग्रंथसंपदा

कथांगण हा मराठी भाषेत एक दीर्घ परंपरा असलेला साहित्य अविष्कार! कथांगण हा ललित कथा संग्रह म्हणजे शहरी आणि ग्रामीण समाज जीवनातील प्रसंग रेखाटणारे एक सहृदय मनाचे व्यक्त होणे! यात खेड्यातील दारिद्र्याचे चटके आहेत, शहरातील राजकारणाचे गमतीदार रंग आहेत. वर्हाडी बोलीचे अप्रूप आहे, तसेच कुस्तीची जिद्द आहे.

विरंगुळा म्हणून लिहिलेल्या या कथा वाचता वाचता अंतर्मुख करणाऱ्या, संवेदना जागविणाऱ्या मनाची स्पंदने आहेत! वाचकाचे अनुभवविश्व समृद्ध करण्याची आणि त्यातील मनुष्यत्व जागे करण्याची क्षमता या कथात नक्कीच आहे!

कथांगण हा मराठी भाषेत एक दीर्घ परंपरा असलेला साहित्य अविष्कार! कथांगण हा ललित कथा संग्रह म्हणजे शहरी आणि ग्रामीण समाज जीवनातील प्रसंग रेखाटणारे एक सहृदय मनाचे व्यक्त होणे! यात खेड्यातील दारिद्र्याचे चटके आहेत, शहरातील राजकारणाचे गमतीदार रंग आहेत. वर्हाडी बोलीचे अप्रूप आहे, तसेच कुस्तीची जिद्द आहे.

विरंगुळा म्हणून लिहिलेल्या या कथा वाचता वाचता अंतर्मुख करणाऱ्या, संवेदना जागविणाऱ्या मनाची स्पंदने आहेत! वाचकाचे अनुभवविश्व समृद्ध करण्याची आणि त्यातील मनुष्यत्व जागे करण्याची क्षमता या कथात नक्कीच आहे!

प. पू . सद्गुरुदास महाराज वर्षातून फक्त एकदाच श्रीदत्तजयंती उत्सवात दत्तजयंतीच्या दिवशी कीर्तनसेवा सादर करतात . या पुस्तकात इ.स. १९९४ ते २००५ पर्यंत सादर झालेल्या १० कीर्तनाचा समावेश आहे. प.पू .महाराजांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदाय, नारदीय संकीर्तन व दत्तपरंपरा यांचा त्रिवेणीसंगम तिथे झालेला दिसतो. ब्रह्मनिरुपणात अद्वैत सिद्धांतांचे सुलभ विवेचन ते करतात. तसेच आख्यानामधील कथांना स्वरचित परांची जोड ते देतात.

पहिल्या वर्षी ‘ सद्गुरुवाचोनि सापडेना सोय’ ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले आहे.पुढे दरवर्षी जो अभंग निरूपणासाठी घेतला त्यातही साधनामार्गातील उपासकाच्या विकासाच्या अवस्था व अभंग निरूपणाचा क्रम यात सुसूत्रता आहे. सद्गुरूंनी दिलेले नाम ज्यावेळी आपण श्रद्धेने व प्रज्ञेने धारण करतो त्यावेळी त्याच्या नादलहरी व किरणशलाका तयार होतात व त्याच्या आघातामुळे आपला ग्रंथीभेद होऊन आपण आत्मसुख प्राप्त करून घेतो.  पुढे भक्ताचा स्वधर्म हा निष्ठावंत भाव असावा असे सांगितले. नाम हेच औषध असून ते आवडीने घ्यावे. देहाबद्दल उदास असलेलाच खरा भक्त असे सांगुन भक्तांवरही संकटे का येतात याचे उत्तर ‘भोग तो न घडे संचितावाचोनी’ असे देतात. प्रारब्ध निर्माण करणे परमेश्वराच्या हाती असले तरी प्रारब्ध संपविणे सद्गुरुंच्या हाती आहे. यापुढील अभंगात वेदांत सांगि तला आहे. ‘काळे खादीला हा अवघा आकार’ या अभंगावर प.पू. बाबांनेही कीर्तन केले आहे व प. पू . सद्गुरुदास महाराजांनी केलेले निरूपण हा त्याचा उत्तरार्ध आहे. त्यांनतर संतदर्शनाचा, सत्संगतीचा परिणाम काय होतो ते सांगतात. देव आपल्या अगदी जवळ असून भक्त संकटात असल्यास तो त्वरित धावतो. शेवटच्या अभंगात अद्वैत वेदांताचे प्रतिपादन करून चिज्जड ग्रंथी म्हणजे काय ? व ती कशी सोडवायची त्यासाठी सत्संगती कशी उपयोगी आहे ते सांगितले आहे. ह्या प्रत्येक निरूपणांनंतर त्याला पूरक अशा संत एकनाथ, दामाजीपंत, भानुदास महाराज, श्रीगुरुचरित्रातील शूद्र व रजक, हरि पालव्याध, समर्थ रामदासस्वामी, मनसखुलाल व   शकंु तराजा ह्यांच्या कथा आख्यानात सांगितल्या आहेत.

या पुस्तकात दत्तजयंतीच्या दिवशी प.पू.सद्गुरुदास महाराज ह्यांनी इ.स. २००५ ते २०१० मध्ये केलेल्या ६ कीर्तनांचा समावेश आहे. प.पू. बाबांनी घालून दिलेल्या परंपरेला अनुसरून प्रत्येक अभंगाच्या निरूपणाचा प्रारंभ ते करतात. उत्सवाच्या आठव्या दिवशी हे कीर्तन होत असल्यामुळे काय आठवायचे ते सांगताना संसार व प्रपंच यातील फरक त्यांनी स्पष्ट केला आहे. प्रपंचातील भाग्यवान उपासकाजवळ कोणते तेरा गुण असावे तेही सांगितले आहे. जर आपल्याला आपले हित साधून घ्यायचे असेल तर भांडण करा, भांडण देवाशी करा, देवाशी केलेल्या भांडणातून आपला भाव अधिक बळकट होतो. सद्गुरुरूपी सूर्य जेव्हा आपल्या जीवनात उगवेल त्यावेळी अज्ञान अंध:कार दूर होतो. भगवंताची चार वेगवेगळी नावे एकाच अभंगात आली आहेत. त्याचे वेगवेगळे संदर्भ व अर्थ ते सांगतात. तसेच पारमार्थिक, व्यावहारिक व प्रतिमासिक ह्या तीन सत्राचे सुंदर वर्णन व स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. भाग्य कशाला म्हणायचे? जन्म कशासाठी घ्यायचा ? सार्थक कशामध्ये आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून दिली आहेत. आठव नाठव गेला म्हणजे मी जीव आहे व मी शि व आहे हे दोन्ही भाव लयाला गेले म्हणजे तो स्वतःच पांडुरंग होतो व जे शिल्लक राहते ते ब्रह्म असे सोपे  विवेचन यात आहे.

देव भेटण्यासाठी गुरुचरणी भाव ठेवावा असे सांगून विज्ञान व अध्यात्म यातील फरकही त्यांनी स्पष्ट केला आहे. गुरु अनेक प्रकारचे असले तरी ‘हरति अज्ञानं इति गुरु’ हेलक्षात ठेवले पाहि जे. सद्गुरुंना चरणच असतात त्यांना देह नसतो. जो असतो तो मायेच्या आधीन असतो. पण त्यांचे चरण मायेच्या आधीन नसतात. बुध्दीमधील भ्रम, प्रमाद, करुणापाटव व विप्रलिप्सा या चार दोषांचे वर्णन व ते नाहीसे करण्याचा उपायही सांगितला आहे. दत्तजयंती उत्सवात सेवाभावाने राहिल्यास आपल्यामध्ये काय बदल होतो ते सांगितले आहे. तसेच याही अभंगात  देवाची जी चार नावे आली आहेत त्यांचा व स्मरण, मनन, चितंन व निदिध्यास या चार क्रियांचा संबंधही स्पष्ट केला आहे. या सर्व निरूपणाला चपरवल बसतील अशा समर्थशिष्या वेण्णास्वामी, प.पू . वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, औधंचे त्र्यबंकपतं कुळकर्णी , सतं  दासगणु महाराज, मुंड गावचे पुंडलिकबाबा भोकरे व राजस्थानातील कुबा कुंभार  त्यांच्या कथा आख्यानात सांगितल्या आहेत.

प्रवचन परिमल भाग १ ह्या पुस्तकात प.पू सदगुरुदास महाराजांनी एखाद्या अभंगावार,आरतीवर, पदावर केलेली प्रवचने संकलीत केली आहेत. अध्यात्म, परमार्थ , वेदान्त यासारखे कठीण विषय अतिशय सोप्या भाषेत ते समजावून देतात. अभंगाचा वरवर दिसणारा अर्थजरी साधा असला तरी त्यातील गुढार्थ ,त्यात गुप्तपणे असलेली योगिक क्रिया फारच महत्वाची आहे. या प्रवचनामध्ये ती समजावतांना सुरवात शारदेच्या सरस्वतीच्या प्रार्थनेने केली आहे.

नाथांच्या अभंगाच्या माध्यमातून सदगुरु कोणाला म्हणायचे  हे सांगताना परमार्थामध्ये तत्त्वज्ञान निराकारावर अधिष्ठीत असल्यामुळे गुरूंना आकारात न पाहता त्यांच्या चरणावरच  मस्तक ठेवावे व चरणनाचेच स्मरण करावे . सद्गुरूतत्व एकच असले तरी आपण ज्याचा अनुग्रह घेतला आहे तेच सदगुरु आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत हे स्पष्ट केले आहे.

आपल्या पिंडात अस्तीत्वात असलेल्या ७२000 प्राणशक्तीवाहक नाडीरुपी नद्या, त्यातील १४ मुख्य नाड्या, त्यांची नावे, शरीरातील त्यांचे स्थान, त्यांचा प्रवास,शरीरातील षटचक्रांची नावे,रंग स्थान ह्याचीही माहीती दिली आहे. नादानुसंधान साधना हा चित्तशुद्धीसाठी करावयाचा योग माऊलीच्या

अभांगाद्वारे समजावला आहे. नादानुसंधान ज्यावेळी साधते त्यावेळी देहातून सुगंधाचा अनुभव येतो. जीवाला भ्रमराची उपमा देऊन बद्ध जीव, गुरूकृपांकित जीव व भ्रामरी विद्या, अनाहत नाद, नादाचे प्रकार हे सर्व समजावले  आहे. समर्थ रामदासस्वामींनी रचलेल्या अवघ्या दोन कडव्याच्या  हनुमंताच्या आरतीत सपूर्ण योगिक प्रक्रिया कशी आहे तेही स्पष्ट केले आहे.

चार पुरुषार्थाशिवाय  प्रेम  हा पाचवा पुरुषार्थ कसा आहे, पुर्णोडहं, पुर्णोडहं प्रेमस्वरुपो ही अनुभूती सद्गुरु आपल्याला कशी देतात हे श्रीगुरुचित्रतातील कथांच्या आधारे समजाविले आहे. आपल्या उपासनेतील ध्यान व नाम या प्रक्रियांमुळे ज्ञान व प्रेम उत्पन्न होते व ते आवश्यकही आहे. स्वप्नं पडणे यासारखीअगदी सामान्य गोष्ट तिचा परामर्याशी कीती जवळचा संबंध आहे हे अनेक थोर संतांची उधारणे देऊन स्पष्ट केले आहे. तसेच रामपंचायतन याचा अर्थही  स्पष्ट केला आहे.  शुद्ध ,उदार ,अखंड आनंदाचा वर्षाव करणा-या सद्गुरूंच्या कृपेला जर आपण प्राप्त झालो तर आपल्या हृदयग्रंथीचा भेद करुन आपल्या आनंदकंदाला  ते कसे जागृत करतात हेही स्पष्ट केले आहे.

प्रवचन परिमल भाग २ या पुस्तकात  केवळ अध्यात्म असा विषय न घेता व्यावहारिक  जगात वावरतांना येणा-या अडचणी,त्यामागची कारणे, त्यावर उपाय व त्याच्या अध्यात्मिक जीवनाशी संबंध काय, अध्यामिक शिकवणीचा तंतु तु न देता व्यावहारिक जगात कसे वागावे , कशी उपासना करावी अश्या  छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा प्राप्त करून घ्यावा हे मार्गदर्शन असलेली प्रवचने संग्रहित केली आहेत. आजचे युग हे विज्ञानयुग आहे.  विज्ञानामुळे अनेक उपकरणांचे शोध लागून त्यामुळे मानवाचे भौतिक जीवन सुखकर झाले आहे. अशावेळी देवाची भक्ती करावी की न करावी ? देवाला मानावे की न मानावे देव मोठा की विज्ञान मोठे? असे प्रश्न उपस्थित होतात या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी माहीती पहिल्याच प्रवचनात दिली आहे. ३५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संमेलनाचे उद्घाटन करतांना भ्रष्टाचार, फुटीरतावाद, अतिरेक्यांची समस्या या विषयावर त्यांनी केलेले भाष्य तंतोतंत खरे झाले प्रबल आत्मशक्ती असेल तर एक व्यक्तीही नवे राष्ट्र कसे निर्माण करू शकते हे त्यांनी शिवचित्राच्या आधारे समजाविले आहे.

उपाधीत न सापडता उपाधीचा विस्तार कसा करावा ? कर्तृत्व सद्गुरूंकडे दिल्यामुळे  निश्चिंत राहू शकतो व कार्य कसे निर्विघ्नपणे सिध्दीस जाते हेही समजाविले आहे.  वृध्दाश्रम हा आज मोठाच भेडसावरणार प्रश्न आहे. कुटुंबसंस्था मोडकळीला का येते आहे ? तसे होऊ नये यासाठी घरातीठ वडिलधाऱ्यांनी  काय करावे ?  तसेच तरुणांनी  कसे वागावे याचे सुंदर मार्गदर्शन यात आहे. अध्यात्माचा जीवनाला आधार कसा आहे ? त्यामळे आपले अंतरंग कसे शुद्ध होते हे समजावण्यासाठी संत मीराबाईच्या जीवनातील एका कथेचा आधार त्यांनी घेतला आहे. तसेच कोजागिरीचा ’ को’ जाग्रति याचाही अर्थ स्पष्ट केला आहे.

उत्सवाची आवश्यकता को आहे?  ते कसे साजरे करावे ? त्यापासून फायदा काय ? उपासना म्हणजे काय ? उपासनेसारख्या सोप्या माध्यमातूनही

तीनही  देहांचा निरास कसा होऊ शकतो हे सांगताना मूर्तिकारचे समर्पक उदाहरण त्यांनी दिले आहे.

गुणात्मक व भावात्मक प्रगती म्हणजे काय ? केवळ उपासकांची संख्या वाढली म्हणजे फार मोठे कार्य झाले असे नाही तर स्वतामध्ये काय बदल वाहावयास हवा याचेही मार्गदर्शन केले आहे, श्री गुरूमंदिरासारख्या मंदिराची आवश्यकता आज का आहे? त्याचे महत्व काय ? बळकट समाज निर्माण होण्यासाठी ते आवश्यक कसे आहे? याचेही विवचन आहे. अगदी अडाणी अशिक्षित व्यक्तीलाही आचरणात आणता येईल अशी दहावी भक्ती  “पायी वारी”.   त्याचे महत्व व माहीतीही येथे दिली आहे.

 मऱ्हाटी माती हा ऐतिहासिक कथा संग्रह आहे. यात ऐतिहासिक सत्याचा धागा न सोडता, लालित्यपूर्ण शब्द पुष्पांनी त्या धाग्याचे रूपांतर सुंदर, सुगंधित पुष्पहारात केले आहे ! हा सुगंध मराठी मातीचा आहे! मातीशी इमान राखणाऱ्या कसदार जोंधळ्या प्रमाणे या  कथा सान-थोर सर्वांचे मन वेधून घेणाऱ्या आहेत. शहाजी महाराज ते थोरले माधवराव पेशवे असा मराठी रियासतीचा मोठा कालखंड, त्यातील निवडक कथांतून आपल्या समोर उलगडतो.

एका लेखात विख्यात इतिहासकार,  डॉक्टर श्री. जयसिंगराव पवार म्हणतात, ‘शिवचरित्रकार विजयराव देशमुख कोण आहेत? म्हणजे इतिहास संशोधक, की इतिहासकार की साहित्यकार? जेव्हा ते ऐतिहासिक साधनांची  चिकित्सा करतात तेव्हा ते इतिहास संशोधक वाटतात, जेव्हा ते इतिहासातील घटनांचा अन्वयार्थ सांगतात तेव्हा ते इतिहासकार भासतात, आणि जेव्हा त्यांचा इतिहास वाचत असताना त्यांच्या  शैलीने वाचक मोहित होतो, तेव्हा ते साहित्यकार वाटतात! ‘  डॉक्टर जयसिंगराव पवार यांनीच या कथासंग्रहास प्रस्तावना दिली आहे.

एकदा या कथा वाचून तर बघा, आपणही त्यावर मोहित झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक प्रसंगातुन काहीतरी मूल्य  रुजविणाऱ्या या कथा आहेत.  मराठी मातीची बुद्धिमत्ता, शौर्य, धैर्य, मराठी मातेचा करारीपणा, परस्त्री माते समान ही शिकवण, निष्ठा, निर्धार, निर्भयता हे गुण दर्शविणाऱ्या आहेत!

सुप्रसिद्ध दुर्ग अभ्यासक प्रा. श्री. प्र. के. घाणेकर सर, ज्याला ४५ वर्षांपूर्वी विजयरावांनी केलेले अचाट धाडस म्हणतात, ती नागपूर ते रायगड ही शिवदुर्ग दर्शन यात्रा कशी घडली? या यात्रेची सुरुवात लेखकांच्याच शब्दात वाचू, ‘बसमध्ये पाऊल टाकले, तो सगळ्यानी घोषणा दिल्या, श्रीगजानन महाराज की जय। श्रीछत्रपती शिवाजी महाराज की जय। भावनोर्मी दाटून आल्या. कुठेतरी बसलो. बस सुरू झाली. अभावितपणे खिशाकडे लक्ष गेले. खिशात एकही पैसा उरलेला नव्हता! आयुष्यातील सतरा दिवसांचा हा प्रवास अन खिशात एक कपर्दिकही नाही. पण म्हणून निराश होण्यासारखे काय होते? महाराजांची कृपादृष्टी होती’  असा हा अनोखा प्रवास म्हणजे धाडसच नव्हे काय? वय वर्षे १८ ते ७४ या दरम्यानचे हे २४ प्रवासी, नव्हे, शिव दुर्ग दर्शन यात्री! आणि या यात्रेत २०० रुपयात प्रवास-निवास सर्व!

वर्ष १९७४ ! चला तर मग आपणही या यात्रेत समील होऊ या! यात जिजाऊंचे माहेर आहे, भोसल्यांचे दैवत आहे! यादवांचा देवगिरी आहे, शिवाईचा शिवनेरी आहे! फिरंगोजींचा चाकण आहे, तुकोबांचा गजर आहे, ज्ञानियांचा राजा आहे! तानाजींचा सिंहगड आहे, पुरंदरचा संग्राम आहे! स्वराज्याचे तोरण आहे, राजगडच्या सदरेत स्वराज्याचे धोरण आहे! प्रतापगडाचा प्रताप आहे, तो संस्मरणीय करणारे समर्थांचे काव्य आहे! सताऱ्याचा पुतळा आहे, अमरावती, कोल्हापूरची अंबाबाई आहे, पन्हाळ्याचा वेढा आहे, बाजीप्रभूंचे बलिदान आहे. विशालता हरवलेला विशाळगड आहे, समुद्रातूनसुरतेच्या लक्ष्मीसह ताठ मानेने उभा सिंधुदुर्ग आहे. या सर्व यात्रेचा कळसाध्याय राजीयांचा रायगड आहे! शिवचरिताची प्रेरणा आहे, समर्थांची वाणी आहे, शिवभक्तांची विनवणी आहे! एक मोठे स्वप्न आहे! सिंहासनाची धुली आहे, समाधीची पूजा आहे, जगदीश्वराचा नंदी आहे!!!

 ‘एका जाणत्या राजाच्या मुलुखाची एका ध्येयवेड्या मनस्वी माणसाने केलेली ही यात्रा होती. त्यांनी अनुभवलेल्या त्या क्षणांमध्ये आपणही कसे गुरफटलो जातो आहोत, हे न कळता आपण त्यात तल्लीन होत जातो’ असे स्वतः घाणेकर सर प्रस्तावनेत लिहितात, तर अशा तल्लीनतेचा अनुभव घेण्यासाठी  हे शिवदुर्ग साहित्याचे देखणे लेणे आपल्या मनात कोरून ठेवायलाच हवे!

ही प. पू.  सद्गुरूदास महाराजांच्या अमृतमहोत्सवानिमित्त काढलेली गौरविका आहे. यातील संपादकीय स्फुरणातून असल्यामुळे चिंतनीय आहे, तसेच त्यांना अर्पण करण्यात आलेले मानपत्र पुन्हा पुन्हा वाचावे असेच आहे. अध्यात्मिक सामाजिक, राजकीय ऐतिहसिक तसेच कलाक्षेत्रातील मान्यवरांचे शुभसंदेशही यात आहेत.  प.  पू. सद्गुरूदास महाराजांच्या कुळाचा इतिहास व त्यांचे स्थुलमानाने चरित्र  यात वर्णन केले आहे.  विजु – विजयराव – शिवकथाकार – शिवचरित्रकार – सद्गुरूदास महाराज असा त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा झाला यातील प्रमुख घटना यात वर्णिल्या आहेत.  बालवयात  त्यांना  स्फुरलेल्या गितांपासून पुढे त्यांनी रचलेली अनेक पदे यात समाविष्ट आहेत.  तसेच त्यांच्या ग्रंथसंपदेचाही परिचय करून देण्यात आला आहे. वयाच्या अर्धशतकापर्यंत शिवचरित्र लेखन व  शिवकार्य करणाऱ्या शिवकथाकारांनी लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत यशस्वी रित्या आयोजित केलेले दोन मोठे उत्सव एक सिंदखेडराजा येथील जीजामाता जन्मोत्सव  व दुसरा वडूकोरोगाव येथील शंभुराजांचा बलिदान दिवस उत्सव याचे वर्णन असून त्यावरून त्यांचे संघटन कौशल्य, कुशाग्र बुध्दीमत्ता, कठोर परिश्रम प्रचंड जिद्ध व स्वत:वर असलेला आत्मविश्वास याचा परिचय घडविला आहे. त्यानंतर सद्गुरू प. पू. विष्णुदास महाराज यांच्या आज्ञेवरून शिवकार्यातून निवृत्त होऊन गुरू कार्य कसे केले याचे हृदयस्पर्शी वर्णन यात आहे.  या काळात गुरूंनी दिलेले नाम धारण करून त्यांच्या कृपेने प्राप्त झालेल्या शक्तीद्वारा अनेक अवघड कार्य त्यांनी कशी केली, या काळात त्यांच्या शक्तीचे उपासकांना आलेले अनुभव, त्यांच्या हातून झालेली मंदिराची उभारणी व जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार याचेही वर्णन आहे. प.  पू.  सदगुरूदास महाराजांसोबत अनेक तीर्थक्षेत्री  जाण्याचे भाग्य कांही उपासकांना लाभले त्या यंत्राचे वर्णन, त्यातील वैशिष्ट्यांसह यात आहे. त्यांच्या या सर्व कार्यात सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असलेली त्यांची अर्धांगिनी शक्तिरुपिणी  सौ. अक्काई ह्यांच्याबद्दलही थोडी माहिती आहे. सद्गुरूंच्या प्रयोगशील अध्यात्माच्या शिकवणीचा प्रसार  करण्यासाठी तसेच त्यांचे विचारधन सर्व उपसाकापर्यंत पोहोचावे त्यासाठी त्यांनी देश विदेश मिळून एकूण १०९ अधायत्मसाधना केंद्र व पत्रभेट ही  मासिक पत्रिकाही सुरू केली.  उपासकांचे मन मेंदु बळकट करण्यासाठी अनेक अध्यात्मिक शिबिरांचे आयोजन केले त्यांची माहिती यात आहे.

प.  पू.  महाराजांचे नातू जे आजच्या विज्ञानयुगातील युवक असून IT क्षेत्रात नोकरी करतात त्यांनाही प. पू. महाराजांच्या शक्तीचा आलेला प्रत्यय  अतिशय भावस्पर्शी  शब्दात त्यांनी व्यक्त केला आहे. प. पू . महाराजांच्या व्यक्तिमत्वाची कितींशी तोंडओळख या गौरविकेच्या वाचनामुळे होऊन  ‘भेटीलागी  जीवा लागलागे ध्यास ‘अशी अवस्था वाचकांची निःसंशय होते.

सांडोनी संशय धरी निर्धार।

श्रीगुरुमूर्ती देईल अपार।

सहज गुरू कृपासागर।

तुज नुपेक्षी सर्वथा।।

 असे आश्वासन ज्या श्रीगुरुचरित्रात दिले आहे, तो मंत्रग्रंथ म्हणून गुरुभक्तात प्रसिद्ध आहे. ‘ ग्रंथ नव्हे साक्षात प्रगटली सरस्वती’ असे यथार्थ वर्णन आरतीत असलेला हा ग्रंथ!  सद्गुरुभक्त श्री. रा.कृ. कामत यांनी १९४० ला उपलब्ध  हस्तलिखित पोथ्यातून परिश्रम पूर्वक संपादित करुन प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी परम विद्वान व तपस्वी श्री. विष्णु केशव पाळेकर उपाख्य अप्रबुद्ध यांनी लिहिलेला पुरस्कार जोडला. अप्रबुद्ध यांनी शके १५०४ इ.स. १५८२ साली लिहिलेल्या पोथीचा उल्लेख केला आहे. हे प्राचीन हस्तलिखित कुठेच मिळत नव्हते. तेव्हा परम पूजनीय सद्गुरुदास महाराज यांच्या  आशीर्वादाने या हस्तलिखित पोथीचा शोध घेणे सूरु झाले. श्रीकिरणराव आणि सौ. कौमुदी ताई  गोडबोले यांच्या प्रयत्नास अकल्पित यश…..

 सर्व भक्तास सेवेची अमूल्य संधी दिली. कारण ‘श्रवणी परायणि स्थिर होई मति।’ या ग्रंथाचे सामर्थ्य फार मोठे आहे. मूळ श्रीनृसिह सरस्वती स्वामींच्या जवळच्या काळातील प्रत उपलब्ध झाली, त्याचे प्रिंटिंग पण झाले, आता ‘गुरूच्या गुरुचरित्राची कीर्ती काय वाणू? ‘ या प्रश्नाचे उत्तर केवळ गुरुभक्तीतुनच प्राप्त होईल. जशी भक्ती दृढ होईल तसे गुरुचरिताची ओळख होईल, आणि त्याची कीर्ती वाखाणण्याची बुद्धी मिळेल, तसेच जशी गुरुचरिताची ओळख होईल, तशी भक्ती दृढ होईल. अशी ही गंमत साखरेच्या गोडीप्रमाणे आहे. तिच्याकडे रोज पाहिले तरी गोडी कशी कळेल? ती चाखून पहावी लागेल. तसेच हे प्राचीन हस्तलिखितावरून संपादित श्रीगुरुचरित्र संग्रही ठेवून वाचावे, त्याची गोडी अनुभवावी!

श्रीगुरुदेव दत्त।

नागपूरला श्रीगुरुमंदिरात गुरुवारची उपासना झाली की, प. पू . सद्गुरुदास महाराज उद्बोधन करीत असत. हे त्यांचे उद्बोधन प्रयोगशील अध्यात्माची शिकवण देणारे, ज्ञान, भक्ति व कर्म यांची कलात्मक सांगड घालून जीवनात आनंद कसा निर्माण करावा हे सांगणारे, उपासकांना बलवान व निर्भय करणारे असे आहे . ह्या पुस्तकात इ.स  २००८ व २००९ मधील एकुण २३ गुरुवारचे उद्बोधन संकलीत आहे. या मार्गदर्शनपर उद्बोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते साचेबद्ध नाही तर श्रीगुरुमंदिरातील प. पू . महाराजांचे जे सिद्धासन आहे त्यावर बसल्यानंतर स्फुरलेले ते आहे. त्या आठवड्यात ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या असतील त्यासंदर्भातील ते आहे. शिवाय त्याकाळात येणारे विविध सणवार, व्रतवैकल्ये, दानधर्म यांची शास्त्रशुद्ध माहिती त्यात आहे. निसर्गाकडून ईश्वराकडे कसे जायचे याचे सुंदर मार्गदर्शन त्यांनी केले आहे . ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ असे या स्फुरणाचे स्वरूप आहे . या उद्बोधनाचे पारायण केले ,याचेच चिंतन केले तर अन्य कुठलेही साधन करण्याची आवश्यकता नाही एवढे याचे सामर्थ्य आहे. शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज ह्यांच्या काही शिष्यांची माहिती जी त्यांच्या पोथीत नाही तीही यात संकलित आहे. भगवान श्रीकृष्ण लोणी चोरून खात मात्र त्यांनी कधीही तूप खाद्याचा उल्लेख केला नाही तो का? भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना प्रत्येक संकटातून कसे सोडविले याचेही वर्णन आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, यावर अतिशय महत्वपूर्ण चिंतन यात आहे. दुष्काळ पडला असता पर्जन्यवृष्टीसाठी करावयाचा उपायही त्यांनी सांगितला आहे. काही विषय कथांच्या माध्यमातूनही स्पष्ट केले आहेत. १८५७ च्या पूर्वीची १५० वर्षे या इतिहासावरही त्यांनी खूप सुंदर प्रकाश टाकला आहे . अतिरेक्यांनी  जो हल्ला केला व त्यात जे नुकसान झाले त्यामागची कारणमिमांसाही त्यांनी स्पष्ट केली आहे. अश्या प्रकारे सहज बोलण्यातून फार मोठे ज्ञानाचे भांडार त्यांनी उघड केले आहे .

काही व्यक्तिरेखांच्या भाळी नियती उपेक्षा लिहून ठेवते. सर्व सामान्य जन नियतीच्या या खेळीला न ओळखता, त्या उपेक्षेत भरच घालीत राहतात. जे सूक्ष्म बुद्धीने स्वतंत्र चिंतन करतात, त्यांना या व्यक्तिरेखांची उपेक्षेची बोच अस्वस्थ करते. ही अस्वस्थता जर  विकार घेऊन  प्रकटली, तर पुन्हा नियतीला अनेक मोहरे सापडतात,खेळवायला. क्वचित एखादा प्रज्ञावंत तटस्थ पणे, साक्षीभूत पणे, अनसूय बुद्धीने नियतीचा हा विशाल पसारा न्याहाळतो. तिच्या खेळातील भूमिका समजून घेतो. कारणाशिवाय कार्य घडत नाही, हे जाणून, त्या सूत्रांचा कार्यकारण भाव समजून घेतो. उपेक्षेची ओझी वाहून दबलेल्या व्यक्तीरेखेची वेदना समजून घेतो. चुकांचे उदात्तीकरण न करता, त्यामागचे सूत्र शोधतो. त्यासाठी ध्यास घेतो, त्या विषयाचा! कमालीचा साक्षेप, चिकित्सक, विनम्र वृत्ती, ईश्वरी सत्तेतील योजना या सर्वांच्या कल्याणा साठीच असतात, हा अढळ विश्वास ठेवतो. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेतो. आणि महर्षी व्यासांच्या दिव्य अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेले सर्व श्रेष्ठ कूट, कोडे असे कर्ण चरित्र- सुर्यपुत्र ही ग्वाही त्या चिंतनातून, त्या लेखणीतून प्रकटते! देव, नंद, विष्णु, रुद्र हे चार प्रयाग तीर्थ, चारधाम यात्रेतील, जिथे गंगेच्या प्रवाहांचा संगम आहे, अशा पाचव्या स्थानास कर्ण प्रयाग हे नाव दिल्या जाते, यातच ज्या कर्ण चरित्राची उपेक्षा करू नका,असा संदेश आहे, तोच संदेश, महाभारतातील मूळ अस्सल प्रतिला प्रमाण मानून, सत्या पासून दूर जाणारा कल्पना विलास न करता ठाम पणे पुढे ठेवलाय परम पूजनीय सद्गुरुदास महाराज यांनी!

     या चरित्राचे प्रकाशन परम पूजनीय विष्णुदास महाराज यांनी केले, तेव्हा ते बोललेत,

 ‘ सतत ध्यास मनातूनी। निर्मिति झाली सुर्यपुत्र ग्रंथी। ज्यातून होते संघर्ष निर्मिती। ज्ञान न म्हणती त्यासी।

पूर्व ग्रह रहित ऐसी।

 दृष्टी ठेवा या ग्रंथी।’

संघर्ष हा मनात हवा, आपले वर्तुळ पूर्ण करण्याचा! विवेकी, ईश्वरी अंश म्हणून जन्मलेला सुर्यपुत्र विकारी झाला, तरी पश्चात्तापाने शुद्ध होऊन, पुन्हा विवेकी होऊन वर्तुळ पूर्ण करतो. सुर्यपुत्र म्हणून सुर्यमंडळात विलीन होतो! नियतीची खेळी ओळखतो.  अर्जुनाला शत्रू  समजून आपल्याला नियती नाचवत आहे. हे शत्रुत्व संपवून,  अनुज असलेल्या अर्जुनाला विजय देऊन  नियतीचा खेळ थांबवून मुक्त होतो.

समरस होऊन वाचले, तर आपल्यात देखील सुर्यपुत्र दडला आहे, आपण देखील ईश्वरी अंश घेऊन आलो आहोत. आपण सुद्धा वर्तुळ पूर्ण करून मुक्त व्हायचे आहे! नियतीचे बाहुले होऊन शत्रुत्वाची घरे बांधून फिरायचे नाही, असा फार मोठा मानसिक सुदृढता, सकारात्मकतेचा संदेश देणारे हे चरित्र, सूर्यपुत्र!

संपूर्ण भारतभर हनुमंत हे सर्व भक्तांचे आवडते दैवत आहे. हनुमान चालीसा हे स्तोत्र देखील भीमरूपी स्तोत्रा सह, सगळ्या हनुमान मंदिरात लिहिले असते. अनेक गावातून याचे नित्य पाठ,गायन केले जाते. यू ट्यूब वर प्रसिद्ध गायक वेगवेगळ्या चालिमधे याला गातात.

 तुलसीदासजी सारखे जे संत आहेत, त्यांच्या मुखातून शब्द जेव्हा जन्म घेतात, तेव्हा त्याचे अर्थ घेऊन उतरतात. स्तोत्र हे पासवर्ड सारखे असते. ते म्हटले की आपण कनेक्ट होतो, पण पुढील सिस्टीम माहीत नसते,त्यामुळे होम स्क्रीन वर आपली बुद्धि, विचार थांबतात,आणि त्या स्तोत्राचा भावार्थ, लक्ष्यार्थ दूरच राहतो.

संतांना जाणण्यासाठी संतच व्हावे लागते. आपले भाग्य की परम पूजनीय सद्गुरुदास महाराज यांनी स्वतः अनुभवलेल्या भक्ती प्रत्ययावरून हनुमान चालीसा या स्तोत्राचा अत्यंत सोप्या शब्दात खोल अर्थ स्पष्ट केला आहे. ४० हाच अंक का? तो कसा ४ पुरुषार्थ, देतो, हे स्तोत्र कसे प्रचंड सात्विक शक्तीने ओतप्रोत आहे, detatched attachment कुणाची असते? मनाचा आरसा कसा स्वच्छ होतो? विद्या तीच जी मुक्त करते. विद्यावंत नम्र असतो. कुशाग्र बुद्धी उजवीकडे, सत्कार्यात वळणे कसे आवश्यक आहे? खरे सत्पुरुष तेजस्वी असतात. सुर्याकर्षण शक्ती, आठ सिद्धी, नऊ निधी कोणत्या? हे सर्व मुद्दे उदाहराणासह स्पष्ट केले आहे.

 म्हणूनच तर वाचायलाच हवे, हनुमान चालीसा एक चिंतन!

मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध. मराठी संकलन सौ. अपूर्वा मार्डीकर, संपादिका, पत्रभेट, हिंदी भावानुवाद श्री. कमल नारायण अवस्थी.

WordPress Warehouse Techogy – IT Service And Technology WordPress Theme Tecz – IT Solutions & Technology WordPress Theme Tessa – Modern Theme for Blogs & Magazines Testimonial Awesome Pro – Testimonial Plugin WordPress Slider TGomatic – Telegram Bot The Gig – Stand-up Club & Night Bar WordPress Theme TheCraft | Responsive Multipurpose WordPress Theme Themify Post Type Builder Thumbnail Preview and Item Grabber WP Plugin Tijarah – Digital Marketplace WooCommerce Theme