प.प. श्रीप्रज्ञानंदसरस्वती (मोघे) स्वामी, दुर्गाघाट, श्रीक्षेत्रकाशी. यांचे आडनाव ‘ मोघे’ असून हे मुद्गल गोत्री कऱ्हाडे ब्राह्मण होते. यांची शरीरयष्टी उंच व धिप्पाड असून, हे गौरवर्णी व अत्यंत तेजस्वी होते. यांची वृत्ती जात्याच विरक्त असून हे अत्यंत निःस्पृह व कडक स्वभावाचे होते. यांचा वेदांताचा सूक्ष्म अभ्यास होता. हे नित्य त्याच वृत्तीत स्थित असत. यांचा त्राटकाचा विशेष अभ्यास होता. त्यामुळे यांचे विशालनेत्र अत्यंत तेजस्वी दिसत असत.
यांना श्रीटेंब्येस्वामींनी दंडदीक्षा दिली होती. मात्र दीक्षा केंव्हा व कोठे दिली यासंबंधी कांहीच तपशील उपलब्ध नाही. अयाचितवृत्तीने ते श्रीक्षेत्रकाशी येथे दुर्गाघाटावर पत्र्याच्या झोपडीमध्ये राहत होते. एक नरोटी व एक लंगोटी एवढाच त्यांचा संग्रह होता. हे नित्य आसन भिक्षा घेत. शिष्याने आसनासमोर ठेवलेल्या नरोटीत कोणी काही आणून ठेवले तरच खात, अन्यथा श्रीगंगेचे पाणी पिऊन आनंदाने दिवस काढीत.
यांचे ठायी पराकोटीची विरक्ती होती. एकदा यांच्या शिष्याला परगावी जावयाचे असल्याने त्यांनी यांच्यासमोर नारळाच्या दोन नरोटया आणून ठेवल्या. हे पाहताच स्वामींनी रूद्रावतार धारण केला, ‘‘ उद्याची तरतूद आज काय म्हणून केलीस?” असे म्हणून त्यांनी दुसरी नरोटी गंगार्पण केली. स्वाभाविकच स्वामींचा दरारा विलक्षण होता. यांच्यासमोर बोलण्याची कोणाचीही प्राज्ञा होत नसे.
प.पू. विष्णुदास महाराजांना वयाच्या २२ व्या वर्षी काशीला स्वामींकडून अनुग्रह प्राप्त झाला. स्वामींनी त्यांच्या काही शिष्यांना संन्यास दीक्षा देवून तपश्चर्येसाठी हिमालयात जाण्याची आज्ञा केली. पण विष्णुदास महाराजांना मात्र संन्यास दीक्षा दिली नाही. ‘निसर्गात सर्व आहे त्यातुनच ज्ञानप्राप्ती होईल’ असा उपदेश केला. शुभ्र वेषात अवधूत रुपात राहून समाजात दत्तभक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा केली व ‘विष्णुदास’ असे पारमार्थिक नामकरण केले. प.प. श्रीप्रज्ञानंदसरस्वतीस्वामी हे श्रीटेंब्येस्वामींच्या शिष्यपरंपरेतील एक विरक्त व कमालीचे साक्षात्कारी सत्पुरूष होते. पराकोटीची प्रसिद्धीपराङ्मुखता हा तर त्यांचा ठळक गुणविशेष होता. असे सांगतात की, ते ध्यान लावून बसले असता एका माणसाने कोळशाच्या सहाय्याने भिंतीवर त्यांचे चित्र काढले. ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी ते पाहिले. थोडया वेळाने लगेच पाऊस येऊन भिंतीवरील चित्र पूर्णतः नष्ट झाले. श्रीक्षेत्रकाशी येथे इ.स. १९२३ साली त्यांनी समाधी घेतली.