पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

योगींद्र जो तनय अत्रि महाऋषींचा । श्रीपादराज पहिला अवतार जयाचा ।

जो हो पुनश्च यति हा नरसिंह देव । तो हाचि भगवान् गुरू वासुदेव ।।

कोकणामधील अप्रतिम सृष्टी सौंदर्याने विनटलेल्या निर्मला नदीच्या काठावर व सावंतवाडीपासून सुमारे ८-९ मैल अंतरावर ‘माणगाव’ आहे. तेथे हरिभट्ट टेम्बे नावाचे सच्छील ब्राह्मण राहात होते. त्यांचे पुत्र  गणेशभट्ट होते. गणेशभट् यांची पूर्वसंस्कारानुसार श्रीदत्तात्रेयांंची भक्ती विशेषत्वाने होती. त्यांना दत्तात्रेयांचे दृष्टांत बरेच वेळा होत. त्यांच्या सेवेने श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले. गाणगापूरच्या दत्तात्रेयांचा प्रसाद असलेले श्री. टेम्बे स्वामी महाराज शके १७७६ आनंद संवत्सरांत श्रावण महिन्यातील कृष्ण पंचमीला रविवारी सूर्योदयापासून २६ घटिकांनी भूतलावर अवतीर्ण झाले.  या संपूर्ण  कुळाचा आणि सकळ जनांचा उध्दार  करणार असल्याची दत्तवाणी आधीच झालेली होती. ‘वासुदेव’ असे मुलाचे नामकरण करण्यात आले. माता सौ. रमाबाई या पतीप्रमाणेच भक्तिपरायण होत्या. अशा दत्त भक्तीमध्ये रममाण असणाऱ्या दांपत्यापोटी प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला.

वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे आजोबा हरिभट्ट हे नदीच्या काठावर उंचावर घर बांधून वास्तव्यास होते,  म्हणून त्यांचे आडनांव टेम्बे असे झाले. कर्ममार्गाचे संस्कार टेम्बे घराण्यात पूर्वापार होते. हा वारसा विशुद्ध स्वरुपात टेम्बेस्वामींनी पुढे चालवला. त्यांचा उपनयन संस्कार आणि गायत्रीमंत्र उपदेश त्यांच्या आजोबांनी केला. विष्णुशास्त्री उकिडवे यांच्याकडे वासुदेवांचे शिक्षण झाले. ते एकपाठी, कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले होते.  बघता बघता ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिध्द  झाले. टेम्बेस्वामींचा ज्योतिष्य, वैद्यकी आणि  मंत्रशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. पंचक्रोशीतले लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणून ओळखत.

त्यांनी वादविवाद कोणाबरोबर आणि कोठेही केव्हाही केला नाही. त्यांनी धरलेला नियम कधीही मोडला नाही. सातत्याने सत्कर्मात काल व्यतीत केला. ही गुणवैशिष्टये प्रारंभापासून सहवासात येणाऱ्यांना कळून  आली. त्रिकाल स्नान,  संध्येचा नियम त्यांनी आजन्म पाळला.  पायात कधीही चप्पल घातली नाही.  कायम पायी अनवाणी भ्रमण केले. सदाचार संपन्नतेमुळे टेम्बेस्वामींचे वेदमंत्र सिध्द झाले होते.  त्यांचे  पिताश्री गणेश भटजी यांचे मृत्यूवर नियंत्रण होते, इतके ते दत्तात्रेयांचे  श्रेष्ठभक्त होते.

टेम्बेस्वामींच्या मंत्राचे सामर्थ्य इतके अफाट होते की द्वाड अशी गाय शांत  झाली. त्याचप्रमाणे सापाला एकाजागी बांधून ठेवले. टेम्बेस्वामींनी पशु, पक्षी,  प्राणी यांना मंत्राद्वारे सुयोग्य स्थितीस आणले.  देशामधील शेकडो लोकांच्या समस्या  सोडवून  संकटमुक्त  केले.  इतका त्यांचा  थोर  अधिकार  होता.  ते दरवर्षी नृसिंहवाडीला जात. नृसिंहवाडी येथे श्रीदत्तात्रेयांनी दृष्टांत देऊन इतर शास्त्रांचा अभ्यास पूर्ण  झालेला असून उपनिषदांचा अभ्यास करण्यास आज्ञा केली.  आयुष्यामधील महत्वपूर्ण अशा गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्याची आज्ञा केली. गुरूंच्या आज्ञेनुसार स्वामींचा विवाह सावंतवाडीचे बाबाजीपंत गोडे यांच्या  कन्येशी म्हणजे अन्नपूर्णाबाईंशी होऊन त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. अन्नपूर्णाबाई या सात्विक  प्रवृतीच्या होत्या.  त्यांना आपल्या पतीच्या प्रगाढ विद्वत्तेचा आणि दत्त्तोपासनेच्या दृढतेचा अभिमान व अत्यानंद होत असे.  पुढे अन्नपूर्णाबाईंना ज्वराची बाधा झाली. आपल्या आयुष्याचे खरे नाही हे जाणून त्यांनी महाराजांना खरे स्वरूप दाखविण्याची विनंती केली.  तेव्हा आपल्या पत्नीला त्यांनी सुयोग्य बोधामृत पाजून तृप्त केले. थोडयाच दिवसात अन्नपूर्णाबाई कालवश झाल्या. केवळ पतिसेवेनेच त्या ब्रह्मपदास जाऊन पोहोचल्या.

पत्नीच्या निधनानंतर १४ व्या दिवशीच टेम्बेस्वामींनी संन्यास स्वीकारला. संसारबंधनातून  स्वामी मुक्त झाले.  दत्तात्रेयांनी त्यांना स्वप्नामध्ये येऊन ‘मंत्र’ दिला आणि जप करण्याची आज्ञा दिली. एका अज्ञात  संन्याशाने संन्यासदीक्षा देऊन ‘‘ प्रेषोच्चार” करवून घेतला. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे ‘प.प. वासुदेवानंदसरस्वती’ असे नामकरण स्वतः श्रीदत्तात्रेयांनी  केले. प्रत्यक्ष भगवान श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेवरून उज्जयिनीस जाऊन तेथील नृसिंहसरस्वतींच्या वंशातील समर्थ संप्रदायाचे श्री नारायणानंदसरस्वती यांचेकडून दंडग्रहण केला. त्यानंतर संपूर्ण भारतात प.प. वासुदेवानंदसरस्वती यांनी एकूण २३ चार्तुमास विविध ठिकाणी केले. त्यामधील १९ वा चातुर्मास स्वामींनी विदर्भातील भंडारा जिल्हयातील वैनगंगा  नदीच्या काठी असलेल्या ‘पवनी’ येथे शके १८३१ मध्ये विठ्ठल मंदिरात केला. या मंदिराच्या  जीर्णोध्दाराचे कार्य स्वामींनी त्यांच्याच परंपरेतील प.पू. विष्णुदास महाराजांचे सत्शिष्य नागपूरच्या श्रीगुरूमंदिरातील प.पू. सद्गुरूदास महाराजांच्या हस्ते करवून घेतले.

प.प. वासुदेवानंदसरस्वती स्वामी हे सिध्द हठयोगी,  मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयामधील  प्रतिभासंपन्न, परतत्वस्पर्शी सिध्दकवी, आदर्श दत्तभक्त आणि साक्षात् दत्तात्रेयस्वरूप होते. ते वैदिक ऋषी  होते. श्रीगुरुचरित्राचा प्रसार संपूर्ण भारतभर व्हावा या उद्देशाने श्री दत्तात्रेयांनी ‘द्विसाहस्त्री’ या ग्रंथाची निर्मिती स्वामी महाराजांकडून करवून घेतली.

प.प. टेम्बेस्वामींची शिष्यपरंपरा फार मोठी आहे. दीक्षितस्वामी, सीताराम महाराज टेम्बे, गोविंद महाराज पंडित, योगानंद सरस्वती (गांडामहाराज), व्यंकटबुवा ब्रह्मचारी, वामनराव गुळवणी,  दत्तमहाराज अष्टेकर, गोपाळबुवा राजाध्यक्ष, रंगावधूत महाराज, शिवानंदस्वामी, वक्रतुण्डबुवा कवीश्वर,  नाना महाराज तराणेकर, गणेशपंत सातवळेकर, शंकरशास्त्री कुलकर्णी अशी आहे. प.प. श्रीप्रज्ञानंदसरस्वती (मोघे स्वामी) याच श्रेष्ठ परंपरेतील सत्पुरूष आहेत. त्यांचे सच्छिष्य प.पू.विष्णुदासस्वामी महाराज यांनी हीच दिव्य परंपरा अनेक वर्षे चालविली. दत्तभक्तीच्या प्रचार प्रसाराचा हाच थोर वारसा प.पू. सद्गुरूदास  महाराज निष्ठेने पुढे नेत आहेत.

माणगांवचे दत्तमंदिराची स्थापना प.प. टेम्बेस्वामींनी केली. स्वामींच्या प्रवासातील मूर्ती,  मूळ दत्तमूर्ती  आणि उत्सवमूर्ती अशा तीन मूर्ती होत्या. स्वामींच्या पूजेतील दत्तमूर्ती त्यांच्याशी संभाषण करत असे.  त्यांच्या दिव्य लेखणीतून दत्तपुराण,   दत्तमहात्म्य, श्रीगुरूसंहिता, समश्लोकी व चूर्णिका, शिक्षात्रयी आदि ग्रंथ साकारले. त्यांनी अनेक  नद्यांची स्तोत्रे लिहिली.  नर्मदेच्या  तीरावर ‘‘श्रीदत्तवासुदेव” मंदिर  बांधले.  त्यांच्या आयुष्यातील अखेरचा मुक्काम गरूडेश्वर येथे झाला. विष्णुपंत सोमण नावाच्या सद्भक्ताने त्यांची  पर्णकुटी बांधून देवून सगळी व्यवस्था ठेवली होती. प.प. वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराज आषाढ शुध्द प्रतिपदेला मंगळवार, आर्द्रा नक्षत्रावर उत्तरायण  असतांना रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या समयास ब्रह्मरूपी लीन झाले.  नर्मदा मातेने आपल्या उदरात महाराजांना कायमचे घेतले.  प्रारंभापासून अंतापर्यत सरितेच्या सान्निध्यात राहून शेकडो लोकांचा उध्दार करून धर्माचा.. दत्तभक्तीचा प्रसार केला. अशा थोर स्वामींना साष्टांग दंडवत !