ज्ञात इतिहासात आदिगुरू दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींमहाराज. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या घडणाऱ्या घटना श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री दत्तात्रेयांच्या संकल्पानुसार घडत असतात. इ.स. १३२० साली भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे ‘गणेश चतुर्थीच्या’ शुभदिनी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले. ब्रम्हश्री अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी स्वामींनी जन्म घेतला. आंध्र प्रदेशातील पीठापुरम् या पूर्व कालापासूनच सिध्दक्षेत्री भगवान दत्तात्रेयांनी कृष्ण – यजुर्वेद शाखेत, आपस्तंभ सूत्रात आणि भारद्वाज गोत्रात लोकांच्या उध्दारार्थ जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या जन्मापासून सतत नऊ दिवस तीन फण्यांच्या नागाने त्यांच्यावर फणा उभारून छाया धरलेली होती. ते मातेच्या उदरामधून सामान्य बालकाप्रमाणे जन्माला आले नाहीत तर ते ज्योति स्वरूपात अवतरले. स्वामींच्या सान्निध्यात जन्मतः क्षणी चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरूष ज्योति रूपाने प्रकट झाले. पवित्र वेदमंत्राचा घोष, आकाशवाणी झाली.
प्रारंभापासून .. जन्मापासूनच अद्भुत आणि अलौकिक घटना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या जीवनात घडल्या. स्वामींनी प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेप्रमाणे अतिशय मधुर आणि अद्भुत लीला केल्या. अनेक प्रसंगी संस्कृत ग्रंथाचे संदर्भ ते ज्येष्ठ मंडळींच्या वादात द्यायचे. काही वाद उत्पन्न झाला तर धर्मशास्त्रीय आधार देवून निर्णय करायचे. जन्मतचः ते सर्वज्ञ होते. ते दोन तीन वर्षाचे झाले असताना त्यांच्या ठिकाणी विद्वत्ता व शास्त्रनिपुणता दिसल्याने लोकांना अत्यंत आश्चर्य आणि कौतुक वाटत असे. मुंज न होताच वेद वेदान्ताचे तत्वज्ञान कसे येते ? ब्रह्मकर्माची अद्ययावत् माहिती कशी झाली? याचे समस्त लोकांना कुतुहल वाटत असे.
सात संवत्सरानंतर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची मुंज मोठया थाटामाटात संपन्न झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. तेव्हा वैराग्यस्त्रीशी विवाह झाला असे सांगून स्वामींनी विवाह बंधनात बांधून घेण्यास पूर्णपणे विरोध दर्शविला. त्यांच्या सुमती मातेने आपल्या अंध .. नेत्रहीन आणि पांगळया पुत्रांकरता विनवणी केली. श्रीपाद श्रीवल्लभांनी शक्तिपात योगाने परिपूर्ण असा अमृत कटाक्ष टाकला. श्रीपादांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे दृष्टी नसलेल्या स्वामींच्या बंधूला दृष्टी प्राप्त झाली. पादहीन असलेल्या दुसऱ्या बंधूस पायात बळ प्राप्त होऊन उत्तम हिंडता ..फिरता येऊ लागले. सुमती मातेच्या अंतःकरणात आनंद आणि आश्चर्याच्या उर्मी उसळल्या. अप्पलराज पिता आणि सुमती माता यांच्या दोन पुत्रांचे म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दोन्ही बंधूंचे अवघे जीवन संजीवित होऊन, स्वामींनी आपल्या मातापित्यांची भविष्यातील चिंता दूर करून ते स्वतः मातृ-पितृ ऋणातून मुक्त झाले. त्यानंतर माता- पिता यांचे आशीर्वाद घेऊन ते तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी १६ व्या वर्षी गृहत्याग केला. ते जगन्नाथपुरी, काशी, बद्रीकेदार अशी उत्तरयात्रा करत भ्रमण करू लागले. त्यांनी शंकराचे प्रत्यक्ष आत्मलिंग स्थापित असलेल्या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री गुप्त रूपात वास्तव्य करून कडक .. निग्रही उपासना, साधना केली. त्यानंतर त्यांनी श्रीशैल्यम् येथे चार महिने वास्तव्य केले. कृष्णा- भीमा म्हणजे निवृत्तीसंगमावरील कृष्णा नदीच्या पात्रात कासवाच्या आकाराच्या बेटावर म्हणजे ‘कुरवपूर’ येथे येऊन राहिले.
कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची तपोभूमी आहे. येथे स्वामींनी १२ वर्षे वास्तव्य केले. ते ज्या खडकावर सूर्योपासना ..सूर्यनमस्कार घालीत त्यावर स्वामींची प्रतिमा उमटली. याच खडकावर तप केल्याने पादुका व शिवलिंग प्रकट झाले. कृष्णेच्या पात्रात अनेक खडक आहेत. या जलामध्ये आणि खडकावर स्वामींनी स्नान, उपासना, तप केल्यामुळे ते पवित्र होऊन गेले. या कुरवपूरच्या पावन भूमीत स्वामींनी तपाचरण करून लोकांना स्वआचरणाने आदर्श घालून दिला. कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेल्या शिलेवर स्वामी बसत. कुरवपूर येथील वास्तव्यात अंबिका मातेला जगद्वंद्य पुत्राच्या प्राप्तीसाठी शनिप्रदोष व्रताचे व रजकाला सुखोपभोगासाठी राज्यपद प्राप्तीचे वरप्रदान तसेच अवतार समाप्तीनंतर त्यांनी तस्करहत्या करून आपला भक्त वल्लभेश याला मृत झाल्यानंतर जीवित करून त्याचे रक्षण केले. या तीन ठळक महत्वपूर्ण घटना कुरवपूर येथे घडलेल्या आहेत.
पाण्यावरून चालणे, मृतास जीवदान देणे, दूरच्या प्रवासात दूध, दही, लोणी यासारखे नाशिवंत पदार्थ उत्तम स्थितीत राहणे, अल्प अन्न अनेक लोकांना पुरून उरणे असे नानाविध चमत्कार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी केले. कर्म मार्गाने आचरण, स्पृश्य – अस्पृश्य भेदाची समाप्ती, भूदान व अन्नदान याचे महत्त्व विशद करून महत्त्वपूर्ण कार्य केले. स्वामींच्या आयुष्यमानाचा विचार केला तर असं लक्षात येत की अवघा तीन दशकांचा जीवनप्रवास असूनही तो लक्षणीय आणि स्मरणीय ठरला. ते ३० वर्षात परिपूर्ण जीवन जगले. त्यांनी अद्भुत लीला दाखवून भक्तांना इह आणि परलोकातील शाश्वत सुख प्रदान केले. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण यासाठी अवतार घेतला. त्यांनी अनेक अहंकारी लोकांचा गर्व .. अहंकार नाहीसा केला. भक्तांना संकटमुक्त करून रक्षण केले. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे पीठापूर आणि कुरवपूर क्षेत्राचा महिमा वर्धित झाला.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा कालखंड इ.स.१३२० ते १३५० असा मानला जातो. त्यांनी १६ वर्षे पीठापूरम येथे आणि १२ वर्षे कुरवपूर येथे वास्तव्य केले. आपल्या तीस वर्षाच्या आयुष्यमानात अनेक लोकांचा उद्वार करून स्वआचरणाचा आदर्श भक्तांसमोर ठेऊन अश्विन वद्य द्वादशीला, मघा नक्षत्र, सिंहराशी असताना निजानंदगमन केले.
अश्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मघा, मृगराजराशी ।
श्रीपाद बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ।। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा निजानंदगमन दिवस ‘ श्रीगुरूद्वादशी’ (अश्विन वद्य द्वादशी) म्हणून अत्यंत श्रद्धेने पाळला जातो.