पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

आदिगुरू श्री दत्तात्रेय

साधूंचे संरक्षण, दुष्टांचे निर्दालन, याचबरोबर सद्धर्माचे प्रत्यक्ष आचरण हे भगवद् अवताराचे मुख्य प्रयोजन आहे. अज्ञानाने व त्यापासून उत्पन्न होणा-या दुःखाने ग्रासलेल्या मानवाचा, यथार्थ ज्ञानाच्या योगाने, उध्दार  करण्यासाठीच भगवंताने श्री दत्तावतार धारण केला. श्री दत्तावतार म्हणजे साक्षात् परब्रह्ममूर्ती  श्री सद्गुरूंचा अवतार. ‘गुरूणां गुरूः’ श्री दत्त,  अत्री-अनसूयेच्या पोटी, त्यांच्या तपस्येचे फ ल म्हणून पुत्ररूपाने प्रकट झाले. विष्णु अवतार असलेल्या दत्तात्रेयांमध्ये अंशमात्राने ब्रह्मा आणि रूद्र अंतर्भूत असतात. उत्पत्ती-स्थिती-लय घडविणा-या अनादि, अनंत, शाश्वत, अयोनिसंभव गुरूतत्वाचे प्रत्यक्ष प्रगटीकरण म्हणजे श्री दत्तात्रेय ! ब्रह्मांड पुराणात महर्षी अत्रींच्या सांगण्यावरून शिवोपासना करून विज्ञानेश्वर शिवाकडून दत्तात्रेयांना योग दीक्षा प्राप्त झाल्याचा उल्लेख असून श्री दत्तावताराचे कारण स्पष्ट दिले आहे.

भूयो  भूतात्मनो विष्णोः प्रादुर्भावो महात्मनः ।

दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परमा युतः । ।

तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मुखेषु च ।

चातुर्वण्ये च संकीर्णे धर्मे शिथिलतां गते । ।

अस्तंगत होणा-या वेदबीजांचे रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी दत्तावतार धारण केला. तेराव्या शतकापासून त्रिमूर्ती दत्तात्रेयांची उपासना प्रारंभ झाली. त्याआधी त्यांचे स्वरूप एकमुखी व चतुर्भुज असल्याचे उल्लेख आहेत. महाभारत, उपनिषदे, पुराणे आदि ग्रंथांमध्ये श्री दत्ताचे स्वरूप एकमुखी, जटाधारी, अवधूत, दिगंबर असल्याचे वर्णन आहे.

आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः ।

मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोघ्स्तुते । ।

अशा शब्दात प्रकट केलेले आहे. शांडिल्योपनिषदात, श्री दत्तांना, विश्वगुरू म्हटले असून त्यांचे स्वरूप –

दत्तात्रेयं शिवं शान्तं इंद्रनीलतिमं प्रभुम् ।

आत्ममायारतं देवं अवधूतं दिगम्बर । ।

अशा शब्दात वर्णन केले आहे. श्री दत्तात्रेयांच्या सगुण मूर्तीचे उजवे अंग गुरूरूप  व डावे अंग मायाधिपती ईश्वररूप आहे. श्री दत्तांमध्ये ईश्वर व गुरू ही दोन्ही रूपे असल्यामुळे गुरू आणि ईश्वर दोघांचीही उपासना उपासकांना घडते. त्यामुळे, ‘श्री गुरूदेव दत्त’ हा त्यांचा जयघोष अन्वर्थक आहे. श्री दत्त गुरूतत्वाचा अंतिम आदर्श आहेत.

श्री दत्तात्रेय ‘अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त’ या रूपात आहेत. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने, मुळ अज्ञानाचा निरास करून, ज्याने संसार बंध निपटून काढला तो अवधूत. अवधूत म्हणजे मूर्तिमंत ज्ञानवैराग्य. ‘ते चालते ज्ञानाचे बिंब’ जीवन्मुक्त, विधिनिषेध, वर्णाश्रमधर्माच्या पलीकडे तो गेला असतो. श्री दत्तात्रेयांचा मुख्य भर आत्मशिक्षणावर आहे. श्री दत्तात्रेयांचा अवतार चिरंतन आहे. श्रीधरस्वामी म्हणतात –

अवतारही उदंड होती । सवेचि मागे विलया जाती ।

तैसी नव्हे दत्तात्रेयमूर्ती ।  नाश कल्पांती असेना । ।

श्री दत्त शरणागतवत्सल म्हणजे भक्तांवर अनुकंपा करणारे आहेत. अविनाशी, दयाघन दत्तात्रेय भक्ताची आर्त हाक ऐकून केवळ स्मरणमात्रे धावून येतात. ‘स्मर्तृगामी स्वभक्तानां उध्दर्ता भवसंकटात् ।’ दत्तमालामंत्रात श्रीदत्ताचे ‘स्मरणमात्रेण संतुष्टाय, महाभयविनाशाय, महाज्ञानप्रदाय’ असे वर्णन आहे. आत्मज्ञानाची अनुभूती देऊन, मृत्युभय दूर करणारे, असा त्यांचा लौकिक आहे.

श्री दत्तावतार संचारी आहे. आर्तांना, पीडितांना, दुःखितांना संरक्षण देत, संकटमुक्त करीत, ते नित्य भ्रमण करीत असतात. श्री दत्त गाणगापुरी ध्यान, कुरूक्षेत्री आचमन, धोपेश्वरी विलेपन,  क-हाडी संध्या, कोल्हापुरी भिक्षा, पंढरीत सुंगधलेपन तर माहूरगडी निद्रा करतात असे प.प.वासुदेवानंद सरस्वतींनी सांगितले आहे. भोग आणि मोक्ष या दोहोंचे दान ते भक्तांना कधी प्रकट तर कधी गुप्तरूपाने देतात. त्यांचा निवास औदुंबरतळी असतो. दत्तसंप्रदायाचा प्रमाणग्रंथ श्री गुरूचरित्र आहे. अतिथीसत्कार, पादुकापूजन यांना विशेष महत्व आहे. धर्म-अध्यात्मक्षेत्रात व्यापक आणि समन्वयात्मक दृष्टिकोन हा दत्तावताराचा महत्वाचा विशेष आहे. श्री दत्तमूर्ती एकात अनेकत्वाचे व अनेकत्वात एकत्वाचे प्रतीक होय.

श्रीमद् भागवतात यदु-अवधूत संवादात श्री दत्तांनी चोवीस गुरू केल्याचे सांगीतले आहे. शेवटच्या स्कंधात भगवान् श्रीकृष्ण ‘अस्माकं कुले दत्तात्रेयः सद्गुरूः’ असा उल्लेख करतात. पौराणिक साहित्यात श्री दत्तात्रेयांचे सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु, यदु, प्रल्हाद, सांकृति, परशुराम इत्यादि प्रधान शिष्य सांगितले आहेत. आदि शंकराचार्य, मत्स्येंद्र, गोरक्ष, चक्रधरस्वामी, जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, श्री समर्थ रामदास, वासुदेव बळवंत फ डके, वासुदेवानंद सरस्वती, नारायण स्वामी, केडगावकर महाराज, जाळवणकर इत्यादि अनेक साधक-सिध्दांना दत्तांनी दर्शन, मार्गदर्शन उपदेश केल्याचे सांगीतले जाते. नाथ आणि आनंद परंपरेचे दीक्षा गुरूत्व, महानुभाव परंपरेचे आदिकारण दत्तात्रेय आहेत. देव परशुरामांना श्री विद्येची दीक्षा दत्तात्रेयांनी दिल्याचा उल्लेख परशुराम कल्पसूत्रात आहे. दत्त-भार्गव संवाद, दत्त-गोरक्ष संवाद हे अध्यात्मात सिध्द ग्रंथ आहेत. कर्म, ज्ञान, योग, तंत्र आणि भक्ती हया सर्व साधनामार्गात दत्तात्रेयांना आदिगुरूंचे स्थान आहे. दत्तात्रेय भूत-प्रेत-पिशाच्च्यादींचे कर्दनकाळ आहेत.

भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः ।

दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामि तम् । । वासुदेवानंद सरस्वती

श्रींच्या सगुणमूर्तीने धारण केलेले माला-कमंडलू हे ब्रह्मदेवाचे, डमरू-त्रिशूळ हे शंकराचे तर शंख व चक्र हे विष्णुचे प्रतीक आहे. त्यांच्या हातातील ५२ रूद्राक्षांची माळ सबीज सरहस्य सर्व मंत्रावरील प्रभुत्वाची द्योतक आहे. कमंडलूतील जल संसारस्थितीला कारण होणा-या कर्माचे प्रतीक आहे. त्रिशूळाची तीन टोके आचार-व्यवहार-प्रायश्चित्त या स्मृतिविभागांचे व धर्म-अर्थ-काम या पुरूषार्थांचे प्रतीक आहे. डमरू अव्दैतबोधाचा निदर्शक आहे. सुदर्शनचक्र ज्ञानरूप ज्योतीचा प्रकाश अभिव्यक्त करणारे आहे. शंख वेदातील अपूर्व-नियम परिसंख्या या त्रिविध कर्मचोदनांचा प्रतीक आहे. धेनु पृथ्वीचे तर श्वान वेदांचे प्रतीक आहेत.

श्री दत्तात्रेयांचा अवतार आणि कार्य तिन्ही युगात अव्याहत सुरू आहे. विज्ञान युगातही दत्तोपासना तेवढीच फलदायी आहे. कलियुगात श्री दत्तोपासना विशेष फलदायी मानली जाते. ‘कलौ चण्डीविनायकौ तृतीयश्च दत्तात्रेयः’ जोपर्यंत मानव तापत्रयांनी त्रस्त्र राहील, तोपर्यंत अज्ञानाच्या अंधारात दत्त उपासना दीपस्तंभाप्रमाणे पथप्रदर्शन करीत राहील. श्री दत्तभक्तीची ज्योत अंतरात ठेवून श्रीगुरूमंदिर नागपूर प्रणीत सर्वच केन्द्रातील उपासक प.पू.विष्णुदास महाराज, प.पू.सद्गुरूदास महाराजांच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रध्देने व निष्ठेने दत्तोपासना करीत आहेत. सर्वच केन्द्रात श्री गुरूचरित्र पारायण, औदुंबर प्रदक्षिणा, पालखी सोहळा, प्रदक्षिणा, नित्य नैमित्तिक सायंकालीन उपासना नियमाने करणारे उपासक पूजा-अभिषेक श्री गुरूपौर्णिमा, गुरूव्दादशी, गुरूप्रतिपदा, श्री दत्तजयंती उत्सव मोठया उत्साहाने आणि प्रसन्नचित्ताने साजरे करीत आहेत.