पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

प. प. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज

कलियुगात व इतिहास  काळात  दत्तात्रेयांचा  दुसरा  अवतार  हा नृसिंहसरस्वती स्वामींचा होय. त्यांचा जन्म शके १३०९ पौष शुध्द द्वितीयेला करंजनगर (लाडाचे कांरजे) जिल्हा वाशीम येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव माधव व मातेचे नाव अंबाभवानी. पति-पत्नी दोघेही शिवभक्त होते. श्री नृसिंहसरस्वतीचे जन्मनाव शालग्राम तर लौकिक नाव नरहरी माधव काळे,  देशस्थ ब्राम्हण, गोत्र-वशिष्ठ, प्रवर-वशिष्ठ, शुक्ल- यजुर्वेदी व माध्यन्दिन शाखेचे ब्राह्मण होते. 

जन्मतःच नृसिंहसरस्वती स्वामी ॐकार शब्द म्हणू लागले. ते सात वर्षाचे झाले तरी ॐकाराशिवाय एकही शब्द उच्चारत नव्हते. त्यामुळे पिता माधव व अंबामाता खूप कष्टी  झाले. शिवपार्वतीच्या कृपा प्रसादाने  मुलगा झाला, पण तो मुका असावा म्हणून पति-पत्नी दुःखी झाले. एक दिवस अंबाभवानी ‘नरहरीला’ जवळ घेऊन म्हणाली की, ‘‘ज्योतिषी सांगतात,  तू अवतारी पुरूष,  युगपुरूष, जगदगुरू आहेस. पण तू बोलत कां नाहीस?”  मातेचे उद्गार ऐकून स्वामींनी खुणेने सांगितले की माझी मुंज करून दिलीत की मला सगळे बोलता येईल. व्रतबंधाच्या वेळी शुभमुहुर्तावर स्वामींनी  मनातल्या मनात गायत्री मंत्राचा उच्चार  केला व भिक्षावळीच्या वेळी स्वामी चारी वेद म्हणून दाखवू लागले. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. मातेच्या आग्रहास्तव मुंजीनंतर ते एक वर्ष घरी राहिले. नंतर मात्यापित्याच्या संमतीने तीर्थयात्रेसाठी  निघाले. जाताना ३० वर्षांनी पुन्हा भेट होईल असे सांगून गेले.

प्रथम काशी येथे ते काशी विश्वेश्वराच्या चरणी काही काळ विसावले. आठ – नऊ वर्षाचे हे तेजस्वी बालक (स्वामी) आपल्या प्रज्ञेने व तपाने काशी निवासी संन्यासीजनांच्या कुतूहलाचा विषय बनले. मणिकर्णिकेच्या  घाटावर त्रिकाळ स्नानास जाणाऱ्या  वृद्ध संन्यासी ‘कृष्णसरस्वती’ यांचेकडून त्यांनी संन्यासदीक्षा ग्रहण केली. काही काळ काशीत राहून बरोबर मुनिजनांचा मेळा घेऊन ते बद्रीकेदारकडे गेले. नंतर सुमेरूला  प्रदक्षिणा घालून ते गंगासागरी  आले.  तेथून गंगातटाक यात्रा करीत प्रयाग येथे आले.  प्रयाग निवासात  माधवनामक एका ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. या ठिकाणी इतर सात शिष्य त्यांना लाभले. त्यात सिध्दसरस्वती हा मुख्य होता जो शेवटपर्यत श्रीनृसिंहसरस्वती स्वामी बरोबर होता. प्रयागपासून दक्षिणेकडची वाट आक्रमित ३० वर्षानंतर ते कारंजा येथे घरी आलेत. सर्वाच्या भेटीगाठी  घेऊन करंजनगरी सोडल्यावर ते त्रंबकेश्वरी आले. त्रंबकेश्वरी गोदावरीचे उगमस्थान पाहून आणि नाशिक क्षेत्रातील सर्व तीर्थस्थाने पाहून त्यांनी गोदावरीची तटाकयात्रा आरंभली. तेथून ते मंजरिका नावाच्या गावी आले. त्या गावी माधवारण्य या नावाचे एक मुनी राहत असत. त्यांना उपदेश करून तेथून ते बासर-ब्रम्हेश्वर या ठिकाणी आले. येथे गोदावरीच्या प्रवाहात पोटदुखीने बेजार होऊन, आत्महत्या करीत असलेल्या ब्राह्मणाला आत्महत्येपासून परावृत्त करून त्यास रोगमुक्त केले. येथेच त्यांची सायंदेवाशी   गाठ पडली. येथेच प्रतिवर्षी ब्राह्मणांना मारणाऱ्या  क्रूर दुष्ट यवन राजापासून सायंदेवाला प्राणदान देऊन त्याच्यावर पूर्ण कृपा केली व १५ वर्षानंतर गाणगापूर येथे आपली भेट होईल असे सांगून ते परळी  वैजनाथ येथे आले.  शिष्यांस तीर्थभ्रमण करण्याचा आदेश देऊन,  भिलवडी या गावी भुवनेश्वरीदेवी संनिध   कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबराच्या घनदाट छायेत (श्री. क्षेत्र औंदुबर , जिल्हा सांगली) त्यांनी एक  चातुर्मास काढला. नंतर ते कृष्णा -पंचगंगा या नदयांच्या संगमावरील  ‘नृसिंहवाडी’  येथे आले. तेथे १२ वर्षांचा काळ गुप्तरूपाने व्यतीत करून पुढे भीमा- अमरजा संगमावरील गाणगापूर येथे त्यांनी सुमारे दोन तपे वास्तव्य केले.  त्यांच्या बऱ्याचशा लीला येथेच घडल्या आहेत. त्यांच्या वास्तव्याने औंदुबर येथील  कृष्णेचे पात्र तीर्थक्षेत्र झाले. अमरापूर जवळील कृष्णा-पंचगंगेच्या पात्रातील अष्टतीर्थे तसेच  भीमा-अमरजाच्या आसपासची अष्टतीर्थे श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी लक्षात आणून दिली दिली.

श्रीनृसिंहसरस्वतीनी आपल्या अमोघ तपःसामर्थ्याने व अदभुतरम्य लीलांनी अनेकांचा उध्दार केला. सायंदेवास क्रूर यवनराजापासून प्राणदान, ब्राह्मणाचे दारिद्रय दूर करणे, शिरोळच्या ब्रह्मसमंधास सद्गती देणे, ब्रह्मराक्षसास गती देणे, वांझ स्त्रीला पुत्र देणे, म्हाताऱ्या वांझ म्हशीला दूध येणे,  मृतपती जिवंत करणे, ब्राह्मणपुत्राला जिवंत करणे,  रोगी लोकांना आरोग्य देणे,  पोटदुखी सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या  ब्राह्मणाला रोगमुक्त करणे,  दरिद्री माणसाकडून सहस्त्रभोजन करविणे, शुष्क झाडाला पालवी आणणे,  कुष्ठरोग बरा करणे असे अनेक चमत्कार व लीला त्यांचेकडून झाल्या.

श्री नृसिंहसरस्वतींचा काल सन् १३८७ ते १४५८ असा मानला जातो. त्यांनी समाजजागृतीचे, लोकरक्षणाचे व सनातन वैदिकधर्माच्या संस्थापनेचे फार मोठे कार्य केले आहे. अनेकांच्या भौतिक व्याधी त्यांनी दूर केल्या, सन्मार्ग दाखवून आत्मिक समाधान प्राप्त करून दिले. त्यांनी व्रतवैकल्ये, धार्मिक विधी यांची पुनस्र्थापना करून सर्वसामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. वर्णाश्रमधर्माची विस्कळित झालेली अवस्था सावरून धरली. आचारधर्माचे नवे आदर्श स्वतःच्या आचरणाने सिद्ध केले.

महाराष्ट्रातील यावनी राजवटीच्या काळात श्रीगुरूंचा प्रभाव यावनी राजवटीवर पडला. यावनी राजावर वचक बसवून सांयदेवाला व ब्राह्मणवर्गाला भयमुक्त व संकटमुक्त केले. स्फोटक झालेला अल्लाउद्दीन शाह बहमनी त्यांच्याकडे श्रद्धेने पाहू लागला. हिंदू परंपरेचा ग्रास घेण्यासाठी टपलेल्या यावनी आक्रमणाच्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे महान कार्य त्यांनी केले.

तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत दत्तोपासनेचा जो प्रवाह वाहत आला होता त्यात जीव ओतण्याचे महत्वपूर्ण कार्य श्रीगुरूंनी केले. काळाच्या ओघात मागे पडलेला संन्यासधर्म संन्यासग्रहण करून पुनस्र्थापित केला. सनातन वैदिकधर्माच्या उत्पत्तीबरोबरच धर्मरक्षणाची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकण्यात आली. ‘ब्राह्मणत्वस्य रक्षणेन रक्षितः स्यात वैदिको धर्मः’ असा ठाम सिद्धांत शंकरचार्यांनी मांडला आहे. म्हणूनच जनतेत आत्मविश्वास उत्पन्न करून ब्राह्मणांना ब्राह्मण्यतत्पर करणे हे महत्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडले.स्फोटक बरा केलेल्या राजाचा निरोप घेऊन श्रीनृसिंहसरस्वती स्वामी सिंहस्थ यात्रेसाठी नाशिक – त्रंबकेश्वरास गेले.  अखेरचा निरोप घेण्यासाठी ते परत गाणगापूरी आले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की यापुढे गुप्तरूपाने राहावे असे मनात आहे. मी तुम्हांला सोडून जात नसून  फक्त  गुरूरूपाने गाणगापूरी राहणार आहे. तेथे निर्गुण पादुका  ठेवून ते आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम् या ठिकाणी  पाताळगंगेच्या किनाऱ्यावरून पुष्पांच्या आसनावर बसून शिशिर ऋतूत,  बहुधान्य नाम संवत्सरात,  कन्यागती बृहस्पती असतांना सूर्य उत्तर दिशेला चालला असता,  संक्रांतीला कुंभ राशीत,  असित पक्ष माघमासी प्रतिपदेला शुक्रवारी पुण्यदिवशी शके १३८० रोजी त्यांनी कर्दळीवनात निजानंदगमन केले.