पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

प.पू.श्री विष्णुदास महाराज

प.पू.श्री विष्णुदास महाराजांचा जन्म कोकण किनाारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील साखळी गावी इतिहासप्रसिध्द पटवर्धन घराण्यात शनिप्रदोष शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी १९०१ रोजी (माघ वद्य द्वादशीसह त्रयोदशी शके १८२२) झाला. महाराजांचे पूर्वाश्रमीचे नांव गुरुनाथ पटवर्धन. महाराजांच्या वडिलांचे नांव दत्तात्रेय तर आईचे नांव लक्ष्मीबाई असे होते. प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे जन्मगाव माणगाव आकेरी या गावाजवळच असल्याने स्वामींचे पटवर्धनांच्या घरी जाणे येणे होते. त्यांचा कृपाशीर्वाद पटवर्धन कुटुंबाला प्राप्त होता. इचलकरंजी येथे वैदिक शिक्षण झाल्यावर महाराजांनी काव्यतीर्थ ही पदवी प्राप्त केली. ईश्वरदर्शनाचा ध्यास घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी घर कायमचे सोडले व काशीला प्रयाण केले.

प.पू. वासुदेवानंद सरस्वतींचे शिष्य श्री प्रज्ञानंदसरस्वती (मोघे स्वामी) यांचे कडून वयाच्या २२ व्या वर्षी काशीला महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला. ‘निसर्गात सर्व आहे त्यातूनच ज्ञानप्राप्ती होईल’ असा श्रीगुुरुंनी उपदेश केला. श्रीगुुरुंनी शुभ्र वेषात अवधूत रूपात राहूनच समाजात दत्तभक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा केली व विष्णुदास असे पारमार्थिक नामकरण केले.

गुर्वाज्ञेने रामेश्वरपासून हिमालयापर्यंत सर्व तीर्थांचे दर्शन घेऊन महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ब्रम्हचर्य व्रत पत्करुन आर्यावर्तातील अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला. सर्व दत्तक्षेत्रांमध्ये कठोर तपस्या व अनुष्ठान केले. वेळोवेळी त्यांना दत्तप्रभूंचे मार्गदर्शन होत असे. महाराजांची ‘श्रीगुरुचरित्रा’ वर अविचल श्रध्दा होती. भ्रमण काळात राष्ट्रोध्दारक चळवळीत, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन समाज स्थितीचा व सामाजिक समस्यांचा बारकाईने अभ्यास केला. आदर्श उपासक कसा असावा ह्याचे चित्र ह्रदयात ठासून घेतले व दत्तसांप्रदायिक उपासनेची अखंड कास धरली.

भांबेरी जवळच असलेल्या खापरखेडा गावातील श्री संपतराव पातोळे या अंध व्यक्तीला पोहचविण्याच्या निमित्ताने आषाढ शुध्द त्रयोदशी शनिप्रदोष शनिवार दिनांक ५ जुलै १९५२ या दिवशी मथुरा- काशीहून महाराजांचे भांबेरी येथे आगमन झाले. काही दिवस भांबेरीत राहिल्यानंतर आपली नेमकी कर्मभूमी सद्गुरुंनी सांगावी,  भटकणे संपून स्थिर चित्ताने उपासना कार्य वर्धिष्णु होत राहावे या उद्देशाने श्रीक्षेत्र माहूर येथे महाराजांनी सप्तशतीचे पाठ केले. श्री रेणुकेच्या आज्ञेने श्रीक्षेत्र कारंजा येथे श्रीगुरुमंदिरात नुसत्या तीर्थावर राहून श्रीगुरुचरित्राची अखंड पारायणे केलीत. भांबेरी-गाडेगाव-तेल्हारा हाच परिसर आपली कर्मभूमी आहे हा नृसिंहसरस्वती स्वामींकडून आदेश प्राप्त झाल्यावर महाराज श्री आबाराव देशमुखांच्या मळ्यात (औदुंबरवाडी) १९५६ सालापर्यंत वास्तव्याला होते. ग्रामीण भागातील दरिद्रिनारायणाची सेवा करण्यासाठी सर्वगुणोत्कर्ष समिती स्थापन केली. भांबेरीकर व परिसरातील लोक ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या विष्णुदास महाराजांना ‘बाबा’ म्हणत असत. १९५६ ते १९५८ पर्यंत बाबा गाडेगावच्या प्राचीन नारायणस्वामी मठात राहायला गेले. तेथे बाबांनी दत्तभुयार बांधले. तेथे दोन वर्ष दत्तजयंती उत्सव साजरा करुन बाबांनी तेल्हारा -गाडेगाव सीमेवरील श्री किसनबुवा वडतकर यांची जागा विकत घेतली व तेथे सुध्दा दत्तभुयार बांधले. १९६० साली भुयारात श्री गणपती, श्री सरस्वती, श्री दत्तात्रेय, श्री नृसिंहसरस्वती महाराज,  श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती स्वहस्ते स्थापन केल्या आणि आश्रमाचे दत्तवाडी असे नामकरण केले.चर्चा, भजन, कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावले. विदर्भ महाराष्ट्रात हजारो शिष्य महाराजांचे अनुग्रहीत आहेत. ज्ञान, भक्ती, कर्म आणि सात्विक प्रेम यांचा आदर्श म्हणजे प.पू.श्री विष्णुदास महाराज! इ.स.१९६९ साली माघ पौर्णिमेला पालखी प्रदक्षिणेचा शुभारंभ झाला. पालखीत दत्तात्रेयांची पितळी मूर्ती, श्री गुरुचरित्र व श्री गजानन विजय ग्रंथ आणि निर्गुण लेप असे. पाच प्रदक्षिणा, तेवीस पदे व आरती असणा-या या सोहोळ्यात नादब्रह्माची अनुभूती येत असे. दत्तवाडीजवळच एका सहा एकर शेतात आश्रम बांधून दत्तबागेची निर्मिती केली. समाधिस्थ होईपर्यंत महाराजांचे वास्तव्य दत्तवाडीतच होते. भांबेरीतील औदुंबरवाडी ही प.पू. बाबांची श्री नृसिंहसरस्वतींनी निर्देशित केलेली आद्य तपोभूमी आहे. याच स्थानी परिसरातील दत्तभक्तीच्या वृक्षाचे बीजारोपण झाले!  ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शुक्रवार दिनांक ८ जून १९९० रोजी बाबांनी अकोला येथे श्रीदत्तचरणी चिरविश्रांती घेतली. प.पू.विष्णुदास महाराजांचे समाधि मंदिर दत्तवाडी(तेल्हारा) येथे आहे.