पूज्य सद्गुरुदास महाराज परिचय
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । झाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचे ॥
ह्या शब्दांत खऱ्या अर्थाने ज्यांचे वर्णन करता येईल, अश्या पूजनीय श्रीसद्गुरुदास महाराजांचा थोडक्यात परिचय -
२८ जानेवारी १९४२ साली अकोला जिल्ह्यातील गाडेगांव या छोट्याश्या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म
बालपणापासूनच ईश्वरार्पण, जिज्ञासू, संशोधनात्मक वृत्ती व प्रासादिक काव्यस्फूर्ती
- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या देशाची अस्मिता आहे. राष्ट्र हे अस्मितेच्या पायावरच उभे असते. शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष होते. अशा या उदात्त राष्ट्रपुरुषाचे चरित्र लेखन करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे.हे शिवधनुष्य आपल्या सर्व सामर्थ्यांनीशी लीलया पेलणारे शककर्ते शिवरायाचे लेखक, शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधनांचा, कागद-पत्रांचा चिकित्सक अभ्यास, अस्सल पुरावे यांच्या आधारावर केलेले अचूक निदान, रसाळ व ओघवती भाषाशैली या वैशिष्ट्यांमुळे शककर्ते शिवराय हे द्विखंडात्मक शिवचरित्र अल्पावधीतच रसिकमान्य झाले.
- ध्यासपर्व म्हणजे ‘शककर्ते शिवराय’ चे लेखक, शिवकथाकार आदरणीय श्री. विजयराव देशमुख यांच्या जीवन कार्याचा धावता आढावा. शिवकार्य हा त्यांच्या जीवनाचा दैदिप्यमान पूर्वार्ध तर गुरुकार्य हा एखाद्या दीपस्तंभ सारखा उत्तरार्ध. आदरणीय विजयरावांना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आकर्षण होते. वाचनाची आवड होती, निडरता, धाडसी, साहसी वृत्ती, तरल संवेदनशील मन, एकाग्रता हे गुण अंगी होते. वयाच्या बाराव्या वर्षी परमपूज्य विष्णुदास महाराज सद्गुरु रूपात लाभले. त्यांच्या कृपाशीर्वादाने जीवनाचे ध्येय निश्चित झालं. त्या दिवसापासून आजतागायत परमपूज्य विष्णुदास महाराजांच्या आज्ञेनुसारच मोठमोठी कार्ये आपल्या हातून घडली, असा श्री विजयरावांचा दृढ विश्वास आहे.
- पुढे कॉलेजमध्ये शिकत असताना बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्रावर व्याख्याने ऐकली व शिवप्रेम अधिकच वृद्धिंगत झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याचा योग आला तेव्हा मुलांना कथा रूप शिवचरित्र सांगण्यास सुरुवात झाली. गणेशोत्सवात सारख्या इतरही उत्सवांमध्ये व्याख्यानासाठी निमंत्रण येऊ लागली. शिवचरित्र सांगण्याची भाषा शैली प्रभावी वक्तृत्व जनतेला भावलं आणि जनतेने उत्स्फूर्तपणे शिवकथाकार ही पदवी बहाल केली. त्याचबरोबर जबाबदारीही वाढली व त्या दृष्टीने अधिक सखोल अध्ययन, अभ्यासाला सुरुवात झाली. जसजसा शिवचरित्राचा अभ्यास वाढत गेला विजयराव झपाटले जाऊ लागले. शिवचरित्राच्या अनुषंगाने रामायण, महाभारत इत्यादी महाकाव्यांचा अभ्यासही करू लागले. यातूनच शिवदुर्ग दर्शन यात्रेची कल्पना समोर आली. पहिली शिवदुर्गदर्शन यात्रा 1974 साली गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर निघाली.या यात्रेचं शिवकथाकारांना शिवचरित्र लिहिण्याची प्रेरणा झाली.
- रायगडावर छत्रपतींच्या सिंहासनाजवळची माती कपाळी लावून प्रतिज्ञा केली की, “महाराज! मी सर्व सामर्थ्यांनीशी आपली शब्दपूजा बांधीन.” त्यानंतर परमपूज्य विष्णुदास महाराजांच्या आशीर्वादाने, द्विखंडात्मक ‘शककर्ते शिवरायाची’ निर्मिती झाली. याच दरम्यान ‘अभिनव ठेव योजना’ स्फुरली. या योजनेअंतर्गत पाच वर्षासाठी लोकांकडून शंभर रुपयांची ठेव घ्यायची व त्याच्या व्याजावर ग्रंथ निर्मितीचा खर्च करून, पाच वर्षानंतर ठेवेसह ग्रंथ लोकांना विनामूल्य द्यायचा. या अभिनव योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद जनता जनार्दनाकडून मिळाला. शिवचरित्र लिहीत असतानाच ‘सिंहासनाधीश्वर’ हे नाटक, ‘महाराजांच्या मुलखात’, ‘सूर्यपुत्र’ आदि ग्रंथांची निर्मिती झाली.
- रामायण, महाभारत, तसेच दासबोध, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र आदि संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास व त्यावर शेकडो प्रवचने. निस्पृहपणे व्रतस्थ राहून आपल्या अफाट संघटन कौशल्याने मोठमोठे लोकोत्सव व आध्यात्मिक शिबिरे विविध तीर्थक्षेत्री यशस्वीरित्या आयोजित
- गुरुवार दि. १६ फेब्रुवारी १९८४, माघ पौर्णिमेला पूजनीय विष्णुदास महाराजांकडून अनुग्रह प्राप्त आणि विष्णुदास महाराजांनी आपल्या गळ्यातील माळ घालून दत्तपरंपरेचा थोर वारसा दिला.
- १९९० साली श्री. विष्णुदास महाराज समाधिस्थ झाल्यावर त्यांच्याच आज्ञेने जयप्रकाशनगर, नागपूर येथे उपासना सुरु. १९९१ साली श्रीविष्णुदास महाराजांनी ध्यानात ‘सद्गुरुदास’ असे नामकरण
- १९९६ साली जयप्रकाशनगर येथील घरी श्रीदत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन ‘श्रीव्यंकटेश’ ह्या घराचे ‘श्रीगुरुमंदिरात’ रूपांतर. हजारो भक्तांना श्रीगुरुकृपेची प्रचीती. अनेक संतांची, सत्पुरुषांची व मान्यवरांची आजवर श्रीगुरुमंदिराला सदिच्छा भेट
- १९९० सालापासून श्रीगुरुमंदिरात श्रीदत्तजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो
- श्रीदत्तजयंतीच्या दिवशी ‘अभंग निरुपण’ कीर्तनाच्या माध्यमातून उद्बोधन. अनेक स्वरचित पदांचा अंतर्भाव. ह्याच कीर्तनांचे संकलन पुढे ‘कीर्तन-कौस्तुभ’ ह्या ग्रंथात करण्यात आले आहे
- २००४ साली श्रीविष्णुदास महाराजांची आद्य तपोभूमी अकोला जिल्ह्यातील भांबेरी येथे श्रीगुरुपंचायतन स्थापन करुन ‘औदुंबरवाडी’ असे ह्या क्षेत्राचे नामकरण. येथे अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन.
- २००७ साली लाखनी (जि. भंडारा) येथे तीन मजली भव्य श्रीगणेशगुरुदत्त मंदिराची स्थापना. श्रीक्षेत्र पवनी येथे ज्याठिकाणी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती यांनी चातुर्मास केला त्या स्थळाचा जीर्णोद्धार.
- भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे श्रीदत्तगुरुपरंपरा मंदिराची आणि साईनगर अमरावती येथे श्रीदत्तमंदिराची स्थापना. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूजनीय महाराजांच्या हस्ते विविध मूर्तीस्थापना
- श्रीगुरुचरित्रातील १४ व्या अध्यायात वर्णन असलेल्या गोदावरीतीरावरील श्रीक्षेत्र बासर (तेलंगणा) येथील श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांच्या ८०० वर्षे दुर्लक्षित अनुष्ठान स्थळाचे व श्रीगुरुभक्त सायंदेव यांच्या वाड्याचे संशोधन.
- जून २०२२ मध्ये नृसिंहस्वामींच्या ह्याच अनुष्ठानस्थळी भव्य दत्तधाम मंदिर, श्रीगुरुपरंपरा मंदिर व श्रीगुरुचरित्र पारायण कक्षाची हंपी, कम्पाली व संकेश्वर पीठांतील यति व शंकराचार्यांच्या शुभहस्ते आणि हजारो दत्तभक्तांच्या साक्षीने स्थापना
- बासर येथील पू. सद्गुरुदास महाराजांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात संकेश्वर करवीर पिठाच्या वतीने दिला जाणारा ‘धर्मभास्कर’ सन्मान शंकराचार्यांकडून जाहीर. तसेच विविध संस्थांकडून ‘विदर्भभूषण’ आणि ‘शिवसंत’, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, मृण्मयी पुरस्कार, रायगड स्मारक समिती शिवपुण्यतिथी पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित
- देशविदेशात चारशेहून अधिक उपासना केंद्र स्थापन. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांत शेकडो उपासना केंद्रांची निर्मिती आणि त्यामार्फत हजारो बाल-तरुण उपासकांचे प्रेरणास्थान
- आध्यात्मिक ग्रंथसंपदा – ’प्रवचन परिमल (२ भाग)’ आणि ‘सहज बोलणे हितोपदेश- प्रवचन संग्रह’, ‘हनुमान चालिसा-एक चिंतन’(हिंदी व मराठी)’,’समर्थ-स्मरण’, ‘कीर्तन-कौस्तुभ’ (३ भाग). श्रीगुरुमंदिरातर्फे ‘पत्रभेट’ हे मासिक २००० सालापासून अखंडपणे धर्म, संस्कृती आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करीत आहे
शककर्ते शिवराय या ग्रंथानेच शिवजन्मतिथीचा वाद संपुष्टात आणला. अथक संशोधनाने सिद्ध झालेली 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख शासनमान्य व जनमान्य झाली. त्याचप्रमाणे 12 जानेवारी 1598 पौषी पौर्णिमा ही राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची जन्म तिथि संशोधनाअंती मान्य झाली. आदरणीय शिवकथाकार विजयराव देशमुख यांची पूर्वार्धातील अविस्मरणीय शिवकार्ये
1) संपूर्ण जनमानसावर शिवरायांचा अस्सल इतिहास आणि त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी सतीचे वाण हाती घेऊन केलेले अजोड कार्य.
2) शिवदुर्ग दर्शन यात्रा 1974 ते 1992
3) व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज,राजा शंभू छत्रपती, सूर्यपुत्र कर्णाचे नेमके चरित्र लोकांना ज्ञात व्हावे म्हणून अभ्यासपूर्ण विश्लेषण, 161 फिल्ड रेजिमेंट सैन्यदल पथकासमोर व्याख्यान. आजवर दहा हजाराहून जास्त व्याख्याने.
4) स्लाईड शो द्वारा दूर्गदर्शन यात्रा छत्रपती सेवा प्रतिष्ठान या संस्थेची 1974 साली स्थापना.
5) जिजामाता जन्मोत्सव सिंदखेड राजा येथे 7 ते 9 जानेवारी 1982 दरम्यान लाखो लोकांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या जन्मस्थानी न भूतो न भविष्यती असा जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सव साजरा झाला.
6) जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार-इतिहास, धर्म, संस्कृती या क्षेत्रात व्रतस्थपणे राहून कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार 1982 पासून आजतागायत या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन अविरत सुरू आहे.
7) शककर्ते शिवराय तब्बल आठ वर्षे हजारो कागदपत्रांचा अभ्यास करून परिश्रमपूर्वक लिहिले गेलेले द्विखंडात्मक शिवचरित्र.
8)महाराष्ट्रातील आजवर लिहिल्या गेलेल्या शिवचरित्रात ‘शककर्ते शिवराय’ अस्सल शिवचरित्र असल्याचा सर्व विद्वानांचा अभिप्राय.
9) किल्ले रायगड येथे शककर्ते शिवराय ग्रंथाची चांदीच्या पालखीतून मिरवणूक.
10) ‘शकनिर्माता’ शिवराय या हिंदी ग्रंथाचे राष्ट्रार्पण.
11) शककर्ते शंभू छत्रपती पृष्ठदान योजनेद्वारा ग्रंथ निर्मिती.
12) शंभूराजे बलिदान दिन वडू कोरेगाव येथे 5 एप्रिल 1989 रोजी धर्मवीर छत्रपती शंभुराजे यांचा 300 वा बलिदान दिन लाखोंच्या उपस्थितीत साजरा.
13) जाणता राजा जानेवारी 1992 विदर्भवासी जनतेसाठी नागपूर येथे प्रथमच जाणता राजा या महानाट्याचे सप्ताहभर भव्य, यशस्वी आयोजन.