पत्रभेट ईमेल

info@patrabhet.in

कार्यालय संपर्क

श्री मंगेश बरबडे - ९९२१२ ३७९९९

चतुर्थ्यामनश्चन्ञ्जपति

‘अहं ब्रह्माऽस्मि’ ही अनुभूति येण्यासाठी चतुर्मितीच्या युगात जावे लागेल. त्रिमितीच्या जगात राहून चालणार नाही. चतुर्मितीच्या युगात जाण्यासाठीच चतुर्थी असते. ज्याला आपण धर्म म्हणतो त्या धर्माच्या संकल्पनेत ही सगळी सूत्रे व्यवस्थित बसविलेली आहेत पण दुर्दैवाने कालमानाप्रमाणे अनेक आक्रमणांमुळे आपले लक्ष तिकडे गेले नाही. आपण गणपतीची उपासना करतांना चतुर्थीचे व्रत करतो. गणपती म्हणजे काय ? चतुर्थी म्हणजे काय ? याचे सगळे विज्ञान श्रीगणेश अथर्वशीर्षामध्ये व्यवस्थित मांडले आहे. त्वं गुणत्रयातीत:, त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:, त्वं मूलाधार: स्थितोऽसि नित्यम्। आपल्या शरीरातील मूलाधार चक्रावर गणपती स्थित आहे. जोपर्यंत त्याची कृपा होत नाही तोपर्यंत ब्रह्मांड शोधण्याचे द्वार उघडत नाही. सुषुम्नेचा प्रवाह त्या मूलाधार चक्रामध्ये बंदिस्त केलेला आहे. हे द्वार उघडण्यासाठी गणपतीची कृपा लागते.

      चतुर्थीचा अर्थ चतुर्थावस्था. जागृति, स्वप्न, सुषुप्ति व तूर्यावस्था. या तूर्यावस्थेमध्ये गणपतीचे दर्शन होणार असते. हे दर्शन झाले की सुषुम्ना नाडीचा मार्ग मोकळा होऊन जी धारा आहे ती राधा होईल. मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस चैतन्य त्याच्या सहस्त्रार चक्रामधून प्रवेश करते. हा प्रवाह खाली जातो म्हणून त्यास धारा असे म्हणतात. अनात्म अशा देहामध्ये चैतन्य वरून खाली प्रक्षेपित होते म्हणून ती धारा. आता साधनेमुळे, उपासनेमुळे आपले मूलाधार चक्र जागृत होईल. गणपती प्रसन्न होईल आणि आम्ही चतुर्थावस्थेमध्ये जाऊ. ही धारा सुषुम्ना नाडीमधून वर जायला लागेल. धाराच्या उलट राधा. जेथे राधा तेथे श्रीकृष्ण. तो राधाकृष्ण, ती शिवशक्ती आहे. धारेतून राधेकडे जात असताना ऊर्ध्व  गती प्राप्त होते. ही ऊर्ध्व  गती प्राप्त होऊन ब्रह्मांडाचे ज्ञान होण्यासाठी चतुर्मितीच्या जगात आपल्याला जावे लागेल. हे संपूर्ण ज्ञान हजारो वर्षांपूर्वीच आपल्या ऋषीमुनींना होते. आज चतुर्मितीचे जग आहे असे सांगणार्‍या विसाव्या शतकातील आईनस्टाईनचे कौतुक करतांना आपण हे विसरतो की या चतुर्मितीच्या जगाची संपूर्ण विज्ञानमय अशी कल्पना आपल्या ऋषीमुनींना होती. अथर्वण ऋषींना ज्यावेळी गणपतीच्या बीजमंत्राचा शोध लागला त्यावेळी त्यांनी गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्राचा उच्चार कशाप्रकारे करावा याचे विधिविधान (फॉर्मुला) सांगितले. फॉर्मुला म्हणजे सिद्धांत किंवा मंत्र , टेक्निक म्हणजे तंत्र व मशीन म्हणजे यंत्र. हे शरीर म्हणजे मशीन. तो मंत्र कार्यान्वित करण्यासाठी तंत्र सांगितले. श्री गणेश अथर्वशीर्षात पूर्ण विज्ञान आहे. त्वं गुणत्रयातीत:, त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:, त्वं मूलाधार: स्थितोऽसि नित्यम्। त्वं शक्तित्रयात्मक: । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वंमिंद्र स्त्वंमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुव: स्वरोम । गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिस्तदनन्तरम्। अनुस्वार: परतर: । अर्धेन्दुलसितम् । तारेण ऋद्धम । एतत्तव मनुस्वरूपम् । गकार: पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्य रुपम् । बिंदुरुत्तररुपम् । नाद: संधानम् सँहिता संधि: । सैषा गणेशविद्या । हा सिद्धांत, मंत्र (फॉर्मुला) आहे. तो लागू कसा करायचा ? (Application of Theory). पुढे ते म्हणतात असा जो गकार ग+अ+ अनुस्वार यातून गं असा नाद निर्माण होतो. या नादाला संपुट लावले आहे ॐकाराचे. कारण तो पृथ्वीचा नाद आहे. म्हणून ॐ गं हा मूळ मंत्र आहे. त्या नादामधून जी आकृती तयार झाली तो गणपती. हा गणपती प्रसन्न झाल्यावर सर्व सिद्धी आपल्यासमोर हात जोडून उभ्या राहतील कारण गणपती हा सिद्धींचा नायक आहे. मूलाधारावर तो स्थित आहे म्हणून कोणत्याही कार्याच्या प्रारंभी पहिले पूजन गणपतीचे असते. अथर्वशीर्ष हा मंत्र आहे. त्या मंत्रातच तो कसा वापरायचा याचे तंत्र (Technique) दिलेले आहे त्याचबरोबर यंत्र (Machine) कोणते आहे ते ही सांगितले आहे. इतका शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीचा विचार आमच्या ऋषीमुनींनी केला आणि त्यालाच त्यांनी अध्यात्म म्हटले.

प.पू. श्री. सद्गुरुदास महाराज

(‘अनंताचा शोध अध्यात्माच्या माध्यमातून’ प्रवचनातील काही अंश)